गेल्या वर्षी जानेवारीमध्ये केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून भारतातील एकूण आयुर्मर्यादेमध्ये ५ वर्षांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या अहवालानुसार पुरुषांचे सरासरी आयुर्मान २००१-२००५ मधील ६२.३ वर्षांवरुन २०११-२०११५ मध्ये ६७.३ वर्षांपर्यंत पोहोचले आहे. स्त्रियांचे सरासरी आयुर्मान ६९.९ वर्षांवरुन ६३.९ वर्षांवर गेले आहे. या अहवालातून आपणासमोर एक आशादायक चित्र उभे राहात असले तरी तज्ञांचा एकच प्रश्न आहे की – या वाढीच्या वर्षांमध्ये निरोगीपणे जगता येणार आहे का?
सध्याच्या पिढीला जीवनशैलीशी निगडित मधुमेह, अतिताण, मधुमेह आणि हृदयविकार अशा विकारांनी ग्रासलेले आहे. वाढता ताण, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढते शहरीकरण यांमुळे आपल्याला होणारे आजार वाढत आहेत आणि त्यामुळे येणारा ताणही वाढतो आहे. यात भर म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील वैद्यकीय खर्च महागले आहेत. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार भारतीय आपल्या आरोग्यावर करत असलेल्या एकूण खर्चापकी ७० टक्के रक्कम स्वतच्या खिशातून देतात. वैद्यकीय महागाईवर दरवर्षी सादर केल्या जाणाऱ्या अहवालामध्ये ही महागाईने ७ ते ८ टक्क्यांनी वाढत असल्याचे दिसून आले आहे. अनपेक्षितपणे एखादा आजार उद्भवला तर आपण काळजीपूर्वक केलेल्या आíथक नियोजनाला सहज िखडार पडू शकते. त्यामुळे तरुण वयातच आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्याचा सल्ला देण्यात येतो.
पुरेशा रक्कमेची आरोग्य विमा पॉलिसी काढलेली असेल तर आणीबाणीच्या काळात पशाकरिता धावाधाव करावी लागत नाही, त्यामुळे डोक्याला शांतता मिळते. बरेच लोक उतरत्या वयात किंवा आरोग्याच्या समस्या भेडसावायला लागल्यानंतर आरोग्य विमा पॉलिसी काढण्याची चूक करतात. तरुण वयातच आरोग्य विमा उतरवून घेतला तर कोणत्याही आरोग्यविषयक समस्या नसतानाही संपूर्ण सुरक्षेची हमी मिळते. तरुण वयात काढलेल्या पॉलिसीचा प्रीमियम उतरत्या वयात काढलेल्या पॉलिसीवर भराव्या लागणाऱ्या प्रीमियमपेक्षा कितीतरी कमी असतो.
वय वाढत जाते तशी वेगवेगळे आजार होण्याची शक्यता वाढते आणि आरोग्य विमा खरेदी करण्याचा खर्चही वाढत जातो. आरोग्य विमा पॉलिसींमध्ये काही आजारांकरिता एक विशिष्ट प्रतीक्षा कालावधी असतो. तरुण वयातच आरोग्य विमा पॉलिसी उतरवून घेतल्यास तुमचे वय वाढत जाताना आणि आरोग्य पॉलिसी वापरण्याची जास्त गरज असताना पॉलिसीची पूर्ण सुरक्षा उपलब्ध असेल. तसेच, आरोग्य विमा पॉलिसी देऊ करणाऱ्या भारतातील काही कंपन्या विशिष्ट वयापर्यंतच आरोग्य विमा पॉलिसी देऊ करतात. याचा अर्थ तुमचे वय वाढत जाईल तसे तुम्हाला उपलब्ध असलेल्या आरोग्य विमा पॉलिसींचे पर्यायही कमी होत जातील.
एकत्रित बोनस मिळणे हा देखील तरुण वयातच पॉलिसी खरेदी करण्याचा एक लाभ म्हणता येईल. मध्यमवयीन व्यक्तीच्या मानाने तरुण व्यक्तींचे आरोग्य विमा पॉलिसीच्या सुरक्षेवर दावा करण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे तरुण वयातच पॉलिसी खरेदी केली असल्यास एकत्रित बोनस विमा उतरवलेल्या रक्कमेच्या ५० टक्के इतकाही असू शकतो. याचा अर्थ तुम्ही १०० टक्के रक्कमेवरील प्रीमियम भरत असाल तरी तुम्हाला मिळणारी विम्याची रक्कम मूळ रक्कमेच्या १५० टक्के असेल! तरुण वयात कोणताही आजार होण्याची शक्यता तुलनेत कमी असते; पण, आयुष्याचा काही भरवसा देता येत नाही, त्यामुळे लवकरात लवकर आरोग्य विमा पॉलिसी खरेदी केलेली केव्हाही चांगली!
आरोग्य विमा खरेदी करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा :
दावा निर्धारणाचा उत्तम रेकॉर्ड असलेल्या प्रतिथयश विमा कंपनीकडूनच विमा पॉलिसी खरेदी करा. विम्याच्या रक्कमेवर दावा करणार असाल तर तसे विमा कंपनीला लवकरात लवकर कळवा.
विमा पॉलिसीमध्ये आपल्याला आधीच असलेल्या आजारांसह सर्व आजारांकरिता प्रतीक्षा कालावधी किती आहे ते तपासून पाहा. प्रतीक्षा कालावधी म्हणजे तुमचा वैद्यकीय खर्च भागवण्याकरिता कंपनी जितका वेळ घेते तो कालावधी होय. तुम्हाला आधीच काही आजार असतील तर, आरोग्य विमा पॉलिसीचा सर्वसाधारण प्रतीक्षा कालावधी २ ते ४ वष्रे असतो.
विमा पॉलिसीवरील उप-मर्यादा ही ध्यानात घ्यायची अजून एक गोष्ट होय. तुमच्या पॉलिसीवर काही उप-मर्यादा असतील तर तुमच्या दाव्याकरिता कंपनी उप-मर्यादेइतकीच रक्कम अदा करते आणि उर्वरित रक्कम तुम्हाला चुकती करायची असते हे लक्षात घ्या. उदा. तुम्ही ५ लाख रूपयांची विमा पॉलिसी उतरवलेली आहे आणि त्या पॉलिसीवरील उप-मर्यादा उतरवलेल्या रक्कमेच्या १ टक्के आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही हॉस्पिटलमध्ये एक खोली भाड्याने घेतलीत आणि त्या खोलीच्या भाड्याकरिता तुम्हाला फक्त ५,००० रुपये मिळतील. तुम्ही डिलक्स खोली भाड्याने घेतली असेल आणि तिचे भाडे ५००० रुपयांहून अधिक असेल तर ५,००० रुपयांच्या वरची रक्कम तुम्हाला तुमच्या खिशातून भरावी लागणार आहे.
आरोग्य विमा ही एक प्रकारची गुंतवणूकच आहे. या गुंतवणूकीवरील परतावे मानसिक आणि आíथक स्वास्थ्याच्या दृष्टीने उपकारक ठरतात. कारण शेवटी, आरोग्य हीच संपत्ती!

लेखक एसबीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.