घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर २०१३ च्या सुरुवातीला ६.६२ टक्क्यांवर नोंदला गेला. हा महागाई दराचा तीन वर्षांचा नीचांक स्तर आहे. सलग चौथ्या महिन्यात घाऊक महागाई दर घसरला असला तरी भाज्या तसेच धान्याचे दर सरलेल्या जानेवारीतही चढेच राहिले आहेत. तथापि रिझव्‍‌र्ह बँकेकडून येत्या महिन्यातील पतधोरण आढाव्यात किमान अध्र्या टक्क्यांची व्याजदर कपात अपेक्षित केली जात आहे.
डिसेंबर २०१२ मध्येही घाऊक किंमत निर्देशांक २०१० नंतर प्रथमच ७.१८ टक्के या स्तरावर आला होता. पुढे जानेवारीत तो आणखी काहीसा खाली येत ६.६२ टक्क्यांवर विसावला आहे. उत्पादित वस्तूंमुळे (-४.८१%) यंदा महागाई कमी दिसत असली तरी या कालावधीत फळ तसेच पालेभाज्यांच्या (+२८.४५%) दरातील वाढीचा भार कायम आहे. कांदे (१११.५२%), बटाटे (७९.०७%) या फळभाज्यांसह एकूण अन्न व प्राथमिक वस्तू (अनुक्रमे +११.८८ ते +१०.३१%) कमालीने महाग झाल्या आहेत. तर एकूण भाज्यांसह गहू (+२१.३९%), तांदूळ (+१७.२१%), मसाले (+१८.०९%), डाळी (+१६.८९%) यांनीही खाद्यान्न घटकांमध्ये वाढ नोंदविली आहे. अंडी, मटण, मासे (+१०.८१%) तसेच दूध (+४.४७%) आणि फळांनीही (+८.४२%) यात भर राखली आहे. इंधनासह ऊर्जा दर मात्र या दरम्यान डिसेंबरमधील ९.३८ टक्क्यांच्या तुलनेत ७.०६ टक्के झाले आहेत. मात्र फेब्रुवारीमध्ये वाढविण्यात आलेल्या इंधन दराचे परिणाम आगामी महिन्यात जाहीर होणाऱ्या निर्देशांकात उमटतील.
किरकोळ तसेच घाऊक किंमत निर्देशांक सध्या वरच्या टप्प्यावर आहे. वस्तूंच्या किंमती कमी होण्यासाठी सरकारद्वारा अन्नधान्यांचा साठा अधिक खुला होण्याची गरज आहे. असे असले तरी मार्च २०१३ पर्यंत महागाई ६.५ टक्क्यांपर्यंत खाली येईल.
– सी. रंगराजन,
पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार.
सध्या खाली येत असलेला महागाई दर हा रिझव्‍‌र्ह बँकेच्या ५ ते ६ टक्के सहनशील आकडय़ानजीकच आहे. किरकोळ, घाऊक असा महागाई दर कमी होत असल्याने आता किमान ०.५० टक्के व्याजदर कमी करण्यास पुरेसा वाव आहे. कमी विकास दर आणि औद्योगिक उत्पादन दर पाहता ते आवश्यक आहे.
– चंद्रजीत बॅनर्जी,
‘सीआयआय’ उद्योग संघटनेचे महासंचालक
आगामी इंधन दरवाढीचा निर्णय आता तेल विपणन कंपन्यांवर अवलंबून आहे. इंधन दरवाढ करायची अथवा नाही किंवा किती करायची याबाबत कंपन्यांच्या शुक्रवारच्या बैठकीत निर्णय होईल.
– पनाबाका लक्ष्मी
पेट्रोलियम राज्यमंत्री