किरकोळ महागाईपाठोपाठ सरलेल्या मे महिन्यातील घाऊक महागाई दरही उंचावला आहे. घाऊक किंमतीवर आधारित मेमधील महागाई निर्देशांक ०.७९ टक्क्यांवर गेला आहे. भाज्यांच्या किमती टक्केवारीबाबत दुहेरी आकडेवारीत वाढल्याने, एप्रिलमधील ०.३४ टक्क्यांच्या तुलनेत हा निर्देशांक दुपटीहून अधिक उसळला आहे.
घाऊक किंमत निर्देशांक मार्च २०१६ मध्ये उणे (-)०.४५ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी मे २०१५ मध्ये महागाई दर उणे (-) २.२० टक्के राहिला आहे. गेल्या वर्षभरापासून त्याचा शून्याखाली प्रवास सुरू होता. एप्रिलमध्ये तो त्यापासून वर आला. तर मेमध्ये त्यात आणखी वाढ झाली.
गेल्या महिन्यात भाज्यांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याने एकूण घाऊक महागाई दर वाढला आहे. एप्रिलमधील २.२१ टक्क्यांच्या तुलनेत मेमध्ये भाज्यांच्या किमती तब्बल १२.९४ टक्क्यांपर्यंत महागल्या आहेत. तर दुहेरी आकडय़ातील डाळींचे दर ३५.५६ टक्के असे आधीच्या महिन्याच्या तुलनेत स्थिर राहिले आहेत.
उल्लेखनीय म्हणजे मेमधील अन्नधान्याच्या महागाईचा दर ७.८८ टक्के नोंदला गेला आहे. एप्रिलच्या तुलनेत तो जवळपास दुपटीने विस्तारला आहे. निर्मित वस्तूंचा महागाई दर ०.९१ टक्क्यांवर, तर इंधन व ऊर्जा महागाई दर (-)६.१४ टक्क्यांवर पोहोचला आहे. चांगला पाऊस अन्नधान्याच्या किमती कमी करण्यास हातभार लावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मेमधील ५.७६ टक्के किरकोळ महागाई दर गेल्या २१ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

सरकारने आता अन्नधान्याच्या वस्तूंच्या नियमित पुरवठय़ाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून डाळी तसेच अन्य खाद्यवस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत.
– डी. एस. रावत
महासचिव, अ‍ॅसोचेम

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती वर्षभर सध्याच्या पातळीवर राहिल्या तर घाऊक किंमत निर्देशांकात जवळपास ३ टक्क्यांची भर पडू शकते.
– अदिती नायर
वरिष्ठ अर्थतज्ज्ञ ‘इक्रा’