देशातील किरकोळ निर्देशांकापाठोपाठ घाऊक महागाईचा निर्देशांकही २०२० च्या अखेरीस सावरला आहे. कांदे, बटाटे आदी खाद्यान्नाच्या किमती रोडावल्याने डिसेंबरमधील घाऊक महागाई दर १.२२ टक्क्यावर स्थिरावला आहे.

२०२० च्या अखेरीस, डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ४.५९ टक्क्यांपर्यंत आल्याचे नुकतेच जाहीर झाले होते. हा दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या अपेक्षित ६ टक्क्यांपेक्षा खूपच कमी आहे. परिणामी येणाऱ्या पतधोरणात व्याज दरकपातीची आशा निर्माण झाली आहे.

देशाचा घाऊक किंमत निर्देशांक महिन्याभरापूर्वी, नोव्हेंबर २०२० मध्ये १.५५ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी, डिसेंबर २०२० मध्ये तो २.७६ टक्के नोंदला गेला होता.

उद्योग व अंतर्गत व्यापाराच्या प्रोत्साहन विभागामार्फत गुरुवारी जाहीर आकडेवारीनुसार, घाऊक किंमत निर्देशांकातील अन्नधान्य गटातील वस्तू नोव्हेंबर २०२० मधील ४.२७ टक्क्यांवरून गेल्या महिन्यात ०.९२ टक्क्यांवर स्थिरावल्या आहेत.

भाज्यांच्या किमती उणे (-) १३.२ टक्क्यांवर आल्या आहेत. तर कांद्याचे दर ५४.६९ टक्क्याने कमी झाले आहेत. तसेच बटाटय़ाच्या किमती ३७.७५ टक्क्यांनी कमी आहेत. आधीच्या महिन्यात त्या तीन अंकी आकडय़ात होत्या.