जूनमध्ये किंमत निर्देशांक २ टक्क्य़ांवर; चलनवाढीचा दोन वर्षांचा किमान दिलासा

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर यंदा सलग दुसऱ्या महिन्यात घसरता राहिला आहे. जूनमध्ये घाऊक महागाई दर २.०२ टक्क्यांवर स्थिरावताना गेल्या जवळपास दोन वर्षांच्या तळात विसावला आहे.

भाज्यांसह इंधन व ऊर्जा गटातील वस्तूंच्या किमती कमी झाल्याने घाऊक महागाई दराने यंदा उसंत घेतली आहे. गेल्याच आठवडय़ात जूनमधील किरकोळ महागाई दर ३ टक्क्यांच्या आणखी पुढे सरकल्याचे स्पष्ट झाले.

सोमवारच्या भांडवली व्यवहारादरम्यानच जाहीर झालेला जूनमधील घाऊक महागाई दर हा गेल्या २३ महिन्यांतील किमान पातळीवर येऊन ठेपला आहे. मेमध्ये हा दर २.४५ टक्के तर वर्षभरापूर्वी, जून २०१८ मध्ये तो ५.६८ टक्के होता.

घाऊक किंमत निर्देशांकाबाबत अन्नधान्याच्या किंमतीचा दर गेल्या महिन्यात किरकोळ कमी झाला आहे. मेमधील ६.९९ टक्क्य़ांच्या तुलनेत तो यंदाच्या जूनमध्ये ६.९८ टक्केच स्थिरावला आहे.

गेल्या महिन्यात भाज्यांच्या किमती महिन्याभरापूर्वीच्या ३३.१५ टक्क्यांवरून २४.७६ टक्क्यांपर्यंत विसावल्या आहेत. तर बटाटय़ाच्या किमती उणे २३.३६ टक्क्यांवरून उणे २४.२७ टक्क्यांवर आल्या आहेत.

कांद्याचे दर मात्र सलग वाढते राहिले आहेत. मेमधील १५.८९ टक्क्यांच्या तुलनेत ते यंदाच्या जूनमध्ये १६.६३ टक्क्यांपर्यंत उंचावले आहेत. तर एकूण घाऊक किंमत निर्देशांक गेल्या महिन्यात जुलै २०१७ नंतर किमान स्तरावर आहेत.

यंदा इंधन व ऊर्जा गटातील घाऊक महागाई दर ०.९८ टक्क्यांवरून उणे २.२० टक्क्यांवर स्थिरावला आहे. तर निर्मित वस्तूंचे दरदेखील १.२८ टक्क्यांवरून ०.९४ टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत.

अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे गेल्या महिन्यातील किरकोळ महागाई दर हा मेमधील ३.०५ टक्क्यांच्या तुलनेत ३.१८ टक्क्यांपर्यंत उंचावला होता. तर दोन महिन्यांपूर्वी २ टक्क्यांच्या आत असलेल्या अन्नधान्याच्या किमती यंदाच्या जूनमध्ये या टप्प्याच्या पुढे गेल्या. किरकोळ महागाई दर सहामाहीच्या वरच्या टप्प्यावर आहे.

देशातील औद्योगिक उत्पादन काहीसे खुंटले आहे. निर्मिती, खनिकर्म क्षेत्रातील सुमार कामगिरीमुळे मेमधील औद्योगिक उत्पादन दर ३.१ टक्के असा वेगाने खाली आला आहे. अर्थविकासाला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून रिझव्‍‌र्ह बँक येत्या महिन्यातील पतधोरणात पुन्हा व्याजदर कपात करण्याची शक्यता आहे.