पेट्रोल-डिझेलच्या किमतीतील भडक्याचा परिणाम

वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे गेल्या महिन्यातील घाऊक किमतींवर आधारीत महागाई दर तब्बल आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात महागाई दर उंचावत मार्च २०२१ मध्ये ७.३९ टक्क्यांच्या चिंताजनक पातळीवर झेपावला आहे.

आधीच्या महिन्यात, फेब्रुवारी २०२१ मध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ४.१७ टक्के होता. तर वर्षभरापूवी, मार्च २०२० मध्ये तो अवघा ०.४२ टक्के होता. करोना साथप्रसारामुळे लागू निर्बंधामुळे उत्पादनांची पुरवठा शृंखलेत अडचणी निर्माण होऊन, किमती वाढल्या आणि त्याचे प्रतिबिंब हे चढ्या महागाई दरात उमटले आहे.

यापूर्वी, ऑक्टोबर २०१२ मध्ये घाऊक महागाई दर ७.४० टक्के या वरच्या स्तरावर होता. गेल्या महिन्यात इंधन तसेच ऊर्जा गटातील वस्तूंच्या किमती आधीच्या महिन्यातील अध्र्या टक्क्याच्या तुलनेत थेट १०.२५ टक्क्यांपर्यंत भडकल्या.

मार्च २०२१ मध्ये अन्नधान्याच्या किमती ३.२४ टक्क्यांपर्यंत वाढल्या. त्याचबरोबर फळे, भाजीपाला, डाळींचेही दर वाढले. डाळींच्या किमती १३.१४ टक्क्यांपर्यंत वाढल्या. तर भाज्यांच्या किमती (-) ५.१९ टक्के नोंदल्या गेल्या.

खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, पोलाद आदींच्या किमती वार्षिक तुलनेत टाळेबंदीमुळे वाढल्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्याने गुरुवारी मार्च २०२१ मधील एकूण घाऊक किंमत निर्देशांक जाहीर करताना स्पष्ट केले.

पुढील दोन महिन्यांत महागाईचा दर ११ ते ८ टक्के असा उतरता असेल, असे इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी म्हटले आहे. पोलाद, वस्त्र, रसायन आदी वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात किरकोळ महागाई दरही वाढल्याचे नुकतेच स्पष्ट झाले. मार्च २०२१ मध्ये हा दर ५.५२ टक्के असा गेल्या चार महिन्यांच्या वरच्या पातळीवर नोंदला गेला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिले द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना रिझव्र्ह बँकेने प्रमुख रेपोसह अन्य दर स्थिर ठेवण्याचे गेल्याच आठवड्यात स्पष्ट केले. पहिल्या तिमाहीत किरकोळ महागाई दर ५.२ टक्के राहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला होता.