बटाटे, टोमॅटो, कांदे आणि भाज्यांच्या किमतीतील भडक्याने घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दराला सप्टेंबर १.३२ टक्के सात महिन्यांच्या उच्चांकावर नेऊन ठेवले आहे. ऑगस्टमध्ये हा महागाई दर ०.१६ या स्तरावर, तर त्या आधीच्या महिन्यांमध्ये बहुतांश बाजारपेठाच टाळेबंदीने ठप्प असल्याने शून्यवत अथवा उणे पातळीवर होता. गेल्या वर्षांतील सप्टेंबरमधील ०.३३ टक्क्य़ांच्या तुलनेतही तो जास्त आहे.

किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दरानेही सप्टेंबरमध्ये ७.३४ टक्के असा आठ महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर झेप घेतल्याची आकडेवारी दोन दिवसांपूर्वी आली आहे. घाऊक महागाई दराने त्याच पावलाने वाटचाल सुरू ठेवली असून, दोन्हींमधील वाढ ही मुख्यत: अन्नधान्यांच्या किमतीनी गाठलेल्या शिखरामुळे आहे.

सरलेल्या सप्टेंबरमध्ये भाज्यांच्या एकूण किमतीत वार्षिक तुलनेत ३६.५४ टक्क्य़ांची वाढ झाली. बटाटय़ाच्या किमती तर मागील वर्षांच्या सप्टेंबरच्या तुलनेत १०७.६३ टक्क्य़ांनी कडाडल्या आहेत. डाळींच्या किमतीही १२.५३ टक्के वाढल्या आहेत. वाढता महागाई दर आणि त्यातही मुख्यत्वे अन्नधान्यांच्या किमतीतील भडक्याची भीती व्यक्त करीत, सलग दुसऱ्या द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीत व्याजदरात कपातीबाबत प्रतिकूलता व्यक्त केली आहे.