24 January 2019

News Flash

मार्चमध्ये घाऊक महागाई दर अडीच टक्क्य़ांखालीच

वर्षभरापूर्वी, मार्च २०१७ मध्ये तो तब्बल ५.११ टक्के होता.

फेब्रुवारीच्या तुलनेत अन्नधान्याच्या किंमतीतही उतार; कांदे-बटाटय़ाच्या किंमती मात्र चढय़ा

गेल्या वित्त वर्षांच्या अखेरीसही घाऊक महागाईचा दर अडीच टक्क्य़ांखालीच राहिला आहे. मार्च २०१८ मध्ये घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाईचा दर २.४७ टक्के नोंदला गेला आहे. आधीच्या महिन्यातील २.४८ टक्क्य़ांच्या तुलनेत त्यात किरकोळ घसरण झाली आहे. भाज्या, डाळी आणि एकूणच अन्नधान्याच्या किमतीतील उतारामुळे यंदा महागाई दर स्थिरावला आहे. वर्षभरापूर्वी, मार्च २०१७ मध्ये तो तब्बल ५.११ टक्के होता.

सोमवारी जाहीर झालेल्या घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दरानुसार, अन्नधान्याच्या किमतीतील उतार हा आठ महिन्यांनंतर प्रथमच दिसून आला आहे. गेल्या महिन्यात भाज्या, डाळी, मसाले, अंडी, मासे आदी खाद्यवस्तू स्वस्त झाल्या आहेत. अन्नधान्याचा घाऊक महागाई दर यंदाच्या मार्चमध्ये घसरून ०.२९ टक्क्य़ांवर विसावला आहे. आधीच्या महिन्यात तो ०.८८ टक्के होता.

डाळींमधील महागाई २०.५८ टक्क्य़ांपर्यंत तर भांज्यांचे दर २.७० टक्क्य़ांपर्यंत घसरले आहेत. त्याचबरोबर गहू, अंडी-मटण-मासे यांच्या किमती अनुक्रमे १.१९ व ०.८२ टक्क्य़ांपर्यंत खाली आल्या आहेत. कांद्याच्या दरातील वाढ मात्र कायम असून गेल्या महिन्यात ते तब्बल ४२.२२ टक्क्य़ांपर्यंत झेपावले आहेत. तर बटाटय़ाच्या किमती ४३.२५ टक्क्य़ांपर्यंत वाढल्या आहेत.

निर्मित वस्तूंच्या महागाईचा दर ३.०३ टक्क्य़ांपर्यंत वाढला आहे. तर साखरेचा दर १०.४८ टक्क्य़ांपर्यंत घसरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या दरातील वाढ ही इंधन व ऊर्जा दरात अनुक्रमे ४.७० टक्के व ३.८१ टक्के वाढ नोंदविणारी ठरली आहे.

चालू वित्त वर्षांत घाऊक महागाईचा दर ३.९ टक्के राहण्याची शक्यता इक्रा रेटिंग्जच्या अदिती नायर यांनी व्यक्त केली आहे. २०१७-१८ मध्ये हा दर २.९ टक्के होता.

किरकोळ महागाई दर कमी झाल्याबाबतची आकडेवारी गेल्याच आठवडय़ात जाहीर झाली होती. मार्चमधील ४.२८ टक्के हा किरकोळ महागाई दर गेल्या पाच महिन्यांतील किमान दर होता.

मार्चमधील घाऊक महागाई दरात काही प्रमाणात उतार दिसला असला तरी पुढील महिन्यात, एप्रिलमध्ये त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर खनिज तेल तसेच नैसर्गिक वायू दरांमधील वाढीमुळे त्याचा दबाव येथे, भारतातही दिसून येऊ शकतो. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरणे हेही येणाऱ्या कालावधीत महागाई वाढविण्यास निमित्त ठरू शकते.

अदिती नायर, प्रधान अर्थतज्ज्ञ, इक्रा रेटिंग्ज.

First Published on April 17, 2018 2:04 am

Web Title: wholesale inflation rate