दोन दिवसांवर आलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याच्या आधी शुक्रवारी बाहेर आलेल्या मे महिन्यांच्या घाऊक किंमत निर्देशांकावर आधारीत महागाई दराच्या ४.७ टक्के या दिलासादायी आकडय़ांमुळे, मध्यवर्ती बँकेकडून अर्थविकासाला पूरक व्याजदर कपातीचे पाऊल टाकले जाण्याबाबत आशा बळावली आहे. घाऊक किमतीवरील महागाई दरात दिसून आलेली ही घट असून, तिने साडेतीन वर्षांपूर्वीची नोव्हेंबर २००९ मधील पातळीवर समाधानकारक उसंत घेतली आहे. गेल्या वर्षी मे २०१२ मध्ये हा महागाई दर ७.५५ टक्के नोंदविला गेला होता. आधीच्या महिन्यातही – एप्रिल २०१३ मध्ये तो ४.८९ टक्के असा पाच टक्क्यांखालीच नोंदविला गेलो. तथापि या निर्देशांकातील अन्नधान्य महागाईचा घटक एप्रिलमधील ६.०८ टक्क्यांवरून, मेमध्ये ८.२५ टक्के असा चिंताजनकरित्या वाढला आहे. उत्पादित वस्तूंच्या घटलेल्या किमती हेच महागाई निर्देशांकातील घटीचे कारण दिसून येते.