नवी दिल्ली : २०१८ च्या अखेरच्या महिन्यात देशातील घाऊक तसेच किरकोळ महागाई दराने मोठा दिलासा ग्राहकवर्गाला दिला आहे. डिसेंबरमध्ये हे दोन्ही प्रमुख महागाई निर्देशांक कमालीचे खाली आले आहेत. गेल्या महिन्यात घाऊक महागाई दर ३.८ टक्के स्थिरावताना गेल्या आठ महिन्यांच्या तळात विसावला आहे. तर याच दरम्यान किरकोळ महागाई दर २.१९ टक्क्य़ांपर्यंत खाली येताना त्याने तब्बल १८ महिन्यांचा नीचांक नोंदविला आहे.

परिणामी रिझव्‍‌र्ह बँकेच्या येत्या महिन्यात येऊ घातलेल्या पतधोरणात व्याजदर कपातीची आपेक्षा निर्माण झाली आहे. १ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारचा नव्या वित्त वर्षांचा तात्पुरता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच मध्यवर्ती बँकेचे व्याजदर बदलाबाबतचे पतधोरण जाहीर होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये खनिज तेलाच्या किंमती तसेच इंधन दरही कमी झाल्याने यंदा व्याजदर कपातीची अधिक आशा आहे.

घाऊक महागाई दराचा ८ महिन्यांचा नीचांक

डिसेंबर २०१८ मध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ३.८० टक्के नोंदविला जात असताना गेल्या आठ महिन्यांच्या किमान स्तरावर स्थिरावला आहे.

इंधन तसेच अन्नधान्याच्या गटातील काही वस्तूंमध्ये दरनरमाईचा हा सकारात्मक परिणाम मानला जात आहे.

नोव्हेंबर व ऑक्टोबरमध्ये हा दर अनुक्रमे ४.६४ टक्के व ५.५४ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी, डिसेंबर २०१७ मध्ये घाऊक महागाईचा निर्देशांक ३.५८ टक्के नोंदला गेला होता. यंदा अन्नधान्याच्या किंमती शून्याखाली ०.०७ टक्क्य़ांवर आल्या आहेत.

किरकोळ महागाई दीड वर्षांच्या तळात

किरकोळ महागाईवर आधारित महागाई निर्देशांक डिसेंबर २०१८ मध्ये २.१९ टक्के स्थिरावताना गेल्या १८ महिन्यांच्या तळात विसावला आहे. फळे, भाज्या तसेच इंधनाच्या किंमती कमी झाल्याचा हा परिणाम आहे.

आधीच्या, नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर २.३३ टक्के तर वर्षभरापूर्वी, डिसेंबर २०१८ मध्ये तो ५.२१ टक्के होता.

यापूर्वीचा हा किमान दर जून २०१७ मध्ये १.४६ टक्के होता. इंधन, ऊर्जा महागाई दर ४.५४ टक्क्य़ांपर्यंत घसरला आहे. तो आधीच्या महिन्यात ७.३९ टक्के होता. तर मटण, मासे आणि डाळींचे दर काही प्रमाणात वाढले आहेत.