ऑगस्टमधील किरकोळ महागाई दराने काहीसा दिलासा दिला असतानाच याच कालावधीतील घाऊक दराने मात्र मोठय़ा प्रमाणात नरमाई नोंदविली आहे. भाज्या तसेच अन्नधान्याचे पदार्थाच्या किमती कमी झाल्याने गेल्या महिन्यातील महागाई दर थेट ३.७४ टक्क्य़ांपर्यंत खाली आला आहे.
जुलै २०१४ मध्ये ५.१९ व ऑगस्ट २०१३ मध्ये ६.९९ असा पाच टक्क्य़ांवर प्रवास करणारा घाऊक किंमत निर्देशांक यंदा पाच वर्षांच्या नीचांकावर येऊन विसावला आहे. ऑक्टोबर २००९ मधील १.८ टक्क्य़ांनंतर यंदाचा हा दर किमान स्तरावर राहिला आहे. ऑगस्टमध्ये अन्नधान्यातील महागाई ५.१६ टक्क्य़ांनी कमी झाली आहे. महिन्यापूर्वी हा दर तब्बल ८.४३ टक्के होता. गेल्या महिन्यात भाज्यांच्या किमती ४.८८ टक्क्य़ांवर आल्या. सलग तिसऱ्या महिन्यात त्यात घट झाली. गेल्या महिन्यात कांद्याच्या किमती ४४.७ टक्क्य़ांनी कमी झाल्या; तर बटाटय़ाचा दर मात्र ६१.६१ टक्क्य़ांनी वधारला. फळांचे दरही २०.३१ टक्क्य़ांनी घसरले. मांसाहारी पदार्थाचे दरदेखील कमी झाले. तर दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या किमती उंचावल्या आहेत. साखर, खाद्यतेल आदी निर्मित खाद्यान्यांच्या किमती जुलैमधील ३.६७ टक्क्य़ांच्या तुलनेत ३.४५ पर्यंत सावरले. एलपीजी, पेट्रोल, डिझेलचा समावेश असलेल्या इंधन व ऊर्जा क्षेत्रातील दरांची जुलैमधील ७.४० टक्क्य़ांसमोर यंदाच्या ऑगस्टमध्ये ४.५४ टक्क्य़ांपर्यंत घसरण झाली. भाज्या तसेच इंधनाचे दर कमी झाल्याने ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दर ७.८ टक्क्य़ांवर आला होता. शुक्रवारी जाहीर झालेला हा दर जुलैमधील ७.९६ टक्के, तर ऑगस्ट २०१३ मधील ९.५२ टक्क्य़ांच्या तुलनेत काहीसा विसावला आहे. मात्र रिझव्‍‌र्ह बँकेला चिंताजनक वाटणारा त्यातील अन्नधान्य दर जुलैच्या ९.३६ टक्क्यांच्या तुलनेत ९.४२ टक्क्यांपर्यंत गेला.