मुंबई : ‘एनएसईएल’ वायदे बाजार घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गैरव्यवहार तपास शाखेने १०० हून अधिक दलाली पेढय़ांना शुक्रवारी समन्स धाडले. यामध्ये देशातील आघाडीच्या दलाली पेढय़ांचा समावेश असून संबंधित बडय़ा प्रवर्तक, अधिकाऱ्यांनाही विचारणा करण्यात येणार आहे.
एनएसईएलच्या २०१३ मधील ४,२०५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच कंपनीचे संचालक, प्रवर्तक कंपनी एफटीआयएल (सध्याची ६३ मून्स टेक्नॉलॉजिज्)चे संचालक, दलाली पेढय़ा तसेच अन्यविरुद्ध चौकशी केली आहे. आर्थिक तपास संस्थेने आता अनेक दलाली पेढय़ांना त्यांचे आर्थिक व्यवहार, पॅन, केवायसी, उत्पन्न, ग्राहक आदींची सविस्तर माहिती मागितली आहे.
एनएसईएल प्रकरणात सेबीने २०१९ मध्ये काही दलालांविरुद्ध कारवाई केली होती. या अंतर्गत त्यांना वायदे बाजारात व्यवहारास मनाई होती. याविरुद्ध अनेक दलालांनी रोखे अपील लवादाकडेही धाव घेतली होती. त्यांच्यासह एनएसईएलचेही म्हणणे नियामक यंत्रणेने धुडकावून लावले होते.