News Flash

‘मिलेनिअल’नी ‘ईएलएसएस’चाच विचार का करावा?

गुंतवणुकीवर आधारित ईएलएसएस फंड योजना त्यांच्यासाठी अतिशय योग्य पर्याय ठरू शकतो.

|| वैभव शहा

वार्षिक करबचत हे सध्याच्या मिलेनिअल पिढीसाठी महत्त्वाचे उद्दीष्ट मानले जाते. दीर्घ कालावधीचे गणित डोळ्यासमोर ठेवून केवळ करबचतच नव्हे तर  संपत्तीनिर्मितीचे उद्दीष्ट हे ईएलएसएसआधारित म्युच्युअल फंड शिस्तबध्द गुंतवणुकीतून मिलेनिअलसाठी पूर्ण करण्यास मदत करू शकतात. ईएलएसएसच्या आधारे करबचतीबाबत वित्तीय सल्लागाराचा सल्ला मिलेनिअल वेळोवेळी घेऊ शकतात आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी या फंडाच्या क्षमतेचा फायदा नक्कीच उचलू शकतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमेशी निगडीत असून कोणत्याही योजनेची कागदपत्रे काळजीपूर्वक वाचणे अतिशय महत्वाचे आहे.

 

जनरेशन वाय किंवा जनरेशन एक्स अर्थात वर्ष १९८० ते २००० दरम्यान जन्माला आलेली आणि ‘मिलेनिअल’ नावाने ओळखली जाणारी पिढी भारतीय लोकसंख्येचा महत्त्वाचा घटक आहे.

देशातील एकूण कामगार, कर्मचाऱ्यांच्या संख्येत या पिढीचा हिस्सा आता जवळपास निम्मा आहे. खुल्या आर्थिक व्यवस्थेनंतरच्या जीवनपद्धतीत वाढलेल्या या पिढीचा पैसे खर्च करण्याच्या पद्धती या आधीच्या पिढीच्या तुलनेत खूपच वेगळ्या आहेत.

‘रजिस्ट्रर अ‍ॅण्ड ट्रान्सफर एजेंटस’ची आकेडवारी बारकाईने पाहिल्यास २०१८-१९ या आर्थिक वर्षांत म्युच्युअल फंडातील नवीन गुंतवणूकदारांपैकी ४७ टक्के गुंतवणूकदार हे ‘मिलेनिअल’ आहेत. ‘मिलेनिअल’ पिढीचे प्रमुख उद्दीष्ट हे करबचत आहे. करबचत उद्दीष्टाकरिता म्युच्युअल फंडातील इक्वि टी लिंकड सेव्हिंग स्कीम अर्थात समभाग गुंतवणुकीवर आधारित ईएलएसएस फंड योजना त्यांच्यासाठी अतिशय योग्य पर्याय ठरू शकतो.

‘मिलेनिअल’करिता  करबचत का महत्वाची?

बहुतांश ‘मिलेनिअल’ हे सध्या त्यांच्या करियरच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आहे. जर ही पिढी ३० टक्क्य़ांच्या चौकटीत राहिली असे आपण गृहीत धरले तर प्राप्तीकर कायदा १९६१ च्या कलम ८०सी नुसार विशिष्ट योजनांमध्ये दीड लाख रुपयांची गुंतवणूक करून दरवर्षी ४६ हजार ८०० रुपयांची करबचत करू शकतात.

करियरच्या अगदी सुरवातीच्या टप्प्यात ते ही समाधानकारक बचत करू शकतात आणि काही वर्षांत त्यात मोठा धनसंचय झालेला दिसेल. ८०सी कलमांतर्गत  केलेल्या गुंतवणुकीवर घसघशीत परतावा तर मिळेलच; परंतु दीर्घ कालावधीत चक्रवाढ पद्धतीने ती कित्येक पटीने वाढूही शकते.

‘मिलेनिअल’साठी ईएलएसएस महत्वाचे का?

सध्याची ‘मिलेनिअल’ पिढी ही २३ ते ३८ वर्षांच्या वयोगटातील आहे. त्यातील बहुतांश जणांना आणखी २५ ते ३५ वर्ष काम करण्याची संधी आहे. त्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक जबाबदारी आत्ताच अतिशय अल्प आहेत. त्यांच्यात जोखीम घेण्याची क्षमताही अधिक असून संपत्ती संचयासाठी समभाग हा त्यांच्याकरिता चांगला पर्याय आहे.

वित्तीय सल्लागारांच्या मते, ‘मिलेनिअल’नी त्यांच्या एकूण गुंतवणुकीपैकी ६० ते ७० टक्के गुंतवणूक ही समभागांमध्ये केली पाहिजे. अल्प कालावधीत समभागांमध्ये मोठय़ा प्रमाणात अस्थिरता असली तरी दीर्घ कालावधीत तीच मोठय़ा प्रमाणात घसघशीत परतावा देऊ शकते.

उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास १९७९ ला बीएसई निर्देशांक अस्तित्वात आल्यानंतर त्याने आत्तापर्यत वार्षिक १५.३ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. अन्य कोणतीही मालमत्ता एवढा परतावा देऊ  शकलेली नाही.  (स्रोत – ब्लुमबर्ग २०१९)

‘इक्लिटी लिंक्ड सेव्हींग स्कीम’ ही प्रामुख्याने समभागांवर आधारित म्युच्युअल फंड योजना असून कलम ८०सी नुसार ती करबचतीस पात्र आहे. यात तीन वर्षांच्या मुदतबंदची सक्ती आहे. ईएलएसएसमधील गुंतवणूक प्रामुख्याने विविध भांडवली रचनेतील कंपन्या आणि उद्योगक्षेत्र, विविध समभाग अथवा त्या त्या क्षेत्रामधील विविध समभागांमध्ये केंद्रीत झालेली असते. गेल्या १० वर्षांत (२१ नोव्हेंबर २०१९ पर्यंत) ईएलएसएस योजनांनी  सरासरी ११.५ टक्के वार्षिक परतावा दिलेला आहे. या योजनेतील आघाडीच्या काही फंडांनी यापेक्षा अधिक परतावा दिलेला आहे. ८०सी कलमांतर्गत गुंतवणुकीत ईएलएसएस ही संपत्तीनिर्मितीत सर्वाधिक उत्तम योजना ठरली आहे. (स्रोत एसीई एमएफचा २१ नोव्हेंबर अहवाल)

ईएलएसएस करबचतीचे सर्वोत्तम गुंतवणूक साधन

वैयक्तिक आणि उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदार प्राप्तीकर कायद्याच्या ८०सी कलमांतर्गत करपात्र उत्पन्नातील काही रक्कम ईएलएसएस म्युच्युअल फंडात गुंतवणूक त्याआधारे दीड लाखांपर्यंत करबचतीचा लाभ मिळवू शकतात. दीर्घ मुदतीत ईएलएसएस फंडातील युनिटच्या विक्रीआधारे एक लाखापेक्षा अधिक नफा झाल्यास त्यावर १० टक्के करआकारणी केली जाते. ईएलएसएस योजनेत दिला जाणारा लाभांश हा करमुक्त आहे. परंतु लाभांभाचे वितरण करण्यापूर्वी म्युच्युअल फंडांना १० टक्के लाभांश वितरण कर भरावा लागतो.

कलम ८०सी अंतर्गत ईएलएसएस ही अतिशय लवचिक गुंतवणूक योजना आहे. ‘मिलेनिअल’साठी हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. ईएलएसएसमधून मुदतीपूर्वीच पैसे काढल्यास अथवा ती बंद केल्यास कोणताही दंड आकारला जात नाही. ही सुविधा विम्याच्या पारंपारित अथवा युनिट आधारित पॉलिसीत मिळत नाही. ईएलएसएसमध्ये विनादंड केव्हाही गुंतवणूक थांबवता येते. (परंतु सहसा अशी शिफारस केली जात नाही.)

लेखक मिराई असेट म्युच्युअल फंड्सच्या उत्पादन आणि विपणन विभागाचे प्रमुख आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 2:46 am

Web Title: why millennials should think of elss akp 94
Next Stories
1 म्युच्युअल फंड मालमत्ता विक्रमी
2 देशातील पहिला कंपनी रोखे ईटीएफ सज्ज
3 SBI कडून व्याजदरात कपात, नव्या ग्राहकांसाठी गृह, वाहन कर्ज स्वस्त
Just Now!
X