मागील काही दिवसांपासून देशभरातील अनेक ठिकाणांवरून शेतमालाला कमी भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या बातम्या येत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला एक रुपया किलो किंवा त्याहूनही कमी दर मिळत आहे. असे असतानाच दुसरीकडे शहरामधील फळ-भाज्यांचे दर त्या तुलनेत कमी झालेले नाहीत. एकीकडे शेतकऱ्यांकडून इतक्या कमी दराने शेतमाल घेतला जात असताना दुसरीकडे शहरातील ग्राहकांना मात्र चढ्या भावाने शेतमाल का विकला जातो हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. मात्र यामागेही काही कारणे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात का शेतकऱ्यांना अल्पभावात विकाव्या लागणाऱ्या भाज्या आणि फळे शहरात चढ्या भावाने मिळतात.

पण त्याआधी पाहूयात मागील काही दिवसांमध्ये समोर आलेली अल्पदरात शेतमाल विकली गेल्याची प्रकरणे

वांग्यांला २० पैसे प्रति किलोचा दर

महाराष्ट्रातील अहमदनगर येथील एका वांग्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्याने २० पैसे प्रति किलो दराने वांगी व्यापाऱ्याला विकली. मात्र त्यानंतर त्याने उद्विग्न होऊन वांग्याच्या शेतातील सर्व झाडे उपटून फेकून दिली.

कांद्याला एक रुपये ४० पैशाचा दर

देशातील ५० टक्के कांद्याचे उत्पादन होणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्येही कांद्याला प्रति किलो एक रुपये ४० पैसे दर मिळाला आहे. या शेतकऱ्याने ७५० किलो कांदा विकून आलेले १ हजार ६४ रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने दिल्लीला मनीऑर्डर करुन ते पंतप्रधान मदतनिधीसाठी दान केले. याची पंतप्रधान कार्यलयाने दखल घेतली असून कांद्याच्या दरांचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला आहे.

कोथिंबीर अडीच रुपये किलो

महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्येही हीच परिस्थिती आहे. हरियाणामधील कर्नाल येथील कृषी बाजारपेठेमध्ये पालक, मुळा तसेच कोथिंबीरसारख्या पालेभाज्यांना दोन ते सात रुपये किलोचा भाव मिळत आहे. राज्याने केवळ कांदा, बटाटा आणि टोमॅटोला हमीभाव देण्याचे धोरण स्वीकारले असल्याने इतर शेतमाल उत्पादकांना व्यापाऱ्यांच्या सांगण्यानुसारच आपला शेतमाल विकण्याशिवाय पर्याय नसतो.

टोमॅटो तीन रुपये किलो

शहरामध्ये रोजच्या वापरातील असणारे टोमॅटोचे दर २० रुपये किलो असताना कृषी बाजारपेठांमध्ये टोमॅटोसाठी शेतकऱ्यांना ३ ते ६ रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. यामधील मुख्य कारण दिले जात आहे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन.

आता जाणून घेऊयात असं का होतं

भारतामध्ये उत्पादन घेतल्या जाणाऱ्या एकूण ताज्या (सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळे) शेतमालापैकी ४० टक्के शेतमाल हा ग्राहकांपर्यंत पोहचण्याआधीच खराब होतो. नाशवंत असल्याने अनेकदा वाहतुकीदरम्यान हा शेतमाल खराब होतो. मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन आणि साठवणूक करण्यासाठी शितगृहांची कमतरता यामुळेही विक्रिसाठी तयार असणारा शेतमाल खराब होण्याचे प्रमाण वाढते. तर काही शेतमाल एखाद्या क्षेत्रापुरताच मर्यादीत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना तो व्यापारी सांगतील त्याच दरात विकावा लागतो.

भारत हा कृषीप्रधान देश असला तरी शेतमाल आणि शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सुविधांचा आभाव आजही प्रकर्षाने जाणवतो. नाशवंत शेतमालावर प्रक्रिया केल्याने तो टिकून राहण्याचा कालावधी वाढतो. मात्र आपल्याकडे कच्च्या शेतमालावर प्रक्रिया करण्याच्या सुविधा उत्पादन होणाऱ्या शेतमालाच्या तुलनेत अगदीच नगण्य आहेत. म्हणूनच भारतामध्ये उत्पादन घेतल्या जाणाऱ्या फळ आणि भाज्यांपैकी केवळ २ टक्के शेतमालावर प्रक्रिया करुन तो ग्राहकांपर्यंत पोहचतो. (हेच प्रमाण दुधाच्या क्षेत्रात ३५ टक्के इतके आहे.) अमरिकेत उत्पादन घेतल्या जाणाऱ्या शेतमालापैकी ६० टक्के तर भारताहून गरीब असणाऱ्या मोरक्कोसारख्या देशातील एकूण उत्पादीत शेतमालापैकी ३५ टक्के शेतमालावर प्रक्रिया केली जाते. भारतातील या परिस्थितीसाठी सरकारी उदासिनता आणि राज्य सरकारांच्या धोरणांनाही काही प्रमाणात दोषी असल्याचे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. सर्वाधिक प्रमाणात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या भाजी आणि फळांसारख्या शेतमालावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभी करण्याऐवजी तुलनेने कमी नाशवंत असणाऱ्या कांदे, टॉमॅटो आणि बटाट्यासारख्या शेतमालाला जास्त महत्व दिले जाते.

कोणाला बसतो फटका?

दरामधील हा गोंधळ नक्की कोणामुळे होतो याबद्दल जाणून घेऊयात. भारतामध्ये भाज्या तसेच फळांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक (म्हणजेच दोन हेक्टर किंवा त्याहून कमी जमीन असणारे) आहेत. त्यामुळे शेतमालाच्या दरामध्ये पडलेला थोडासा फरक देखील या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम करतो. भारतातील एकूण शेतजमीनीपैकी १० टक्क्याहून कमी क्षेत्रफळावर भाज्या तसेच फळांचे उत्पादन घेतले जात असले तरी बागायती शेतीखाली क्षेत्र हे धान्य शेतीखालील क्षेत्राच्या तुलनेत झपाट्याने वाढत आहे. आज भारतामधील एकूण शेतजमीनीचा विचार केल्यास बागायती शेतीचे प्रमाण धान्य शेतीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी वाढले आहे.

तात्पर्य

थोड्यात सांगायचे तर व्यापारी जेवढा माल शेतकऱ्यांकडून खरेदी करतात त्यापैकी बराचसा माल हा ग्राहकांच्या हाती पडेपर्यंत खराब होतो आणि तो फेकून द्यावा लागतो. तसेच हा शेतमाल ग्रामीण भागांमधून शहरातील बाजारापेठेमध्ये आणण्याचा खर्च व्यापारी करतात. त्यामुळेच हा खर्च होणारे नुकसान आणि टप्प्याटप्प्यामध्ये शेतमाल विक्रिमध्ये वाढत जाणारे व्यापारी यामुळे शेतमालाचा दर ग्राहकांच्या हाती पोहचेपर्यंत अनेक पटींनी वाढलेला असतो.