तेजी आली आणि सुखद जाणिवेचा आस्वाद देण्याआधी भुर्रकन लुप्तही झाली. काय कमावले आणि किती कमावले, हा हिशेब लावून पाहिला. पण गेल्या वर्ष-दीड वर्षांत बाजाराशी इमान राखूनही नफा गवसला असे सर्वसामान्य गुंतवणूकदार विरळाच सापडले.

जर आपण सरलेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदार अर्थात एफआयआयकडून झालेल्या व्यवहारांवर नजर फिरविली तर या काळात प्रत्येक व्यवहार झालेल्या दिवसांत सरासरी १,००० कोटी रुपये मूल्यांच्या समभागांची विक्री या गुंतवणूकदार संस्थांकडून झाली आहे. केवळ ऑगस्ट २०१५ मधील त्यांची विक्रीची मात्रा १५,००० कोटी रुपयांची राहिली आहे. म्हणजे अमेरिकेत लेहमन ब्रदर्सने दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर झालेल्या पडझडीत ऑक्टोबर २००८ मध्ये झालेल्या निर्गुतवणुकीपेक्षा ती अधिक होती.

एफआयआयच्या यंदाच्या या निरंतर विक्रीतून बाजार निर्देशांकात ८.५ ते ९ टक्क्यांची घसरण झाली, तर ऑक्टोबर २००८ मधील १४,००० कोटी रुपयांच्या एफआयआयच्या निर्गुतवणुकीतून त्या वेळी बाजार २० टक्क्यांनी गडगडला होता. या तफावतीचे कारण काय? यंदाच्या ऑगस्टमध्ये विदेशी संस्थांची निर्गुतवणूक सुरू होती तर देशांतर्गत गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांकडून त्याच प्रमाणात खरेदीही सुरू होती. वर वर पाहता ही खूपच उत्साहवर्धक बाब वाटेल. बाजारात तोल एका बाजूने ढळू नये यासाठी देशी गुंतवणूकदारांनी संतुलन सांभाळण्याची भूमिका बजावणे स्वागतार्हच! पण बाजारातील म्युच्युअल फंडांची खरेदी ही नव्या गुंतवणूकदारांकडून नव्हे, तर प्रचलित गुंतवणूकदारांकडून प्रामुख्याने एसआयपीमार्फत दरमहा भर पडणाऱ्या गुंतवणुकीतून आहे. नवीन गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांतील ओघ आजही क्षीणच आहे. भांडवली बाजाराबाबत सर्वदूर कटू अनुभूती आणि अविश्वासाची भावना आजही मोठी आहे, हेच खरे!

भारताच्या भांडवली बाजाराने गेल्या तीन दशकांत वार्षकि सरासरी १७ टक्के दराने परतावा दिला आहे. त्याच वेळी म्युच्युअल फंडांच्या समभाग-संलग्न (इक्विटी) योजनांचा गेल्या दोन दशकांतील सरासरी वार्षकि परतावा त्यापेक्षा सरस २० टक्के  राहिला आहे. म्हणजे एक गोष्ट स्पष्टच आहे की, कुणाही सामान्य गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा मोठय़ा कालावधीसाठी ध्यास कायम ठेवल्यास त्यांना सहजी मोठी संपत्ती बनविता येते. पण हे खरेच शक्य झाले आहे काय? आपल्या आसपास, ओळखीपाळखीत विचारा, पाहा आहे काय कुणी असा भाग्यवान संपत्ती निर्माता? खरेच कुणी सापडला तर तो असामान्यच! कारण सर्वसामान्यांचे सामान्यपणे असणाऱ्या गुंतवणूक आचरणातून असे घडणे शक्यच नाही.

फार तर तीन ते कमाल पाच वर्षांत नफा दिसला की बाहेर पडा, अशीच झटपट धाटणीची आपली गुंतवणूक असते. त्या पल्याड तग धरणे, सबुरी राखणे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचेच! क्वचित कुणी तरी आधीच्या १, ३, ५ वर्षांत चांगला परतावा पाहतो आणि पुढच्या काळातही असाच फार तर थोडा कमी-जास्त परतावा राहील म्हणून गुंतवणूक सुरू ठेवण्याचा संयम ठेवतोही. पण परतावा कामगिरी मोठय़ा कालावधीसाठी निरंतर सारखीच राहील, असे क्वचितच घडते. हाच नेमका कसोटीचा क्षण असतो. पण आपण मुळातच वर्तमान व नजीकच्या भूतकाळातील परतावा कामगिरी पाहून गुंतवणुकीस सुरुवात करतो आणि अपेक्षा करतो की, बाजार तेजी पुढेही अशीच सुरू राहील. पेच येथेच आहे. हा व यासारखा गुंतवणुकीचा दृष्टिकोन निश्चितच योग्य नाही.

डोकेदुखी असेल तर कुणाकडून डोके दाबून घेऊन ती घालविता येत नाही, पण खाली डोके वर पाय असे शीर्षांसन केल्यास डोकेदुखी धूम पळाल्याचे लक्षात येईल. याच प्रकारे आपण आजवर जे करीत आलो त्याच्या नेमके उलटे करा. खरेच चमत्कार घडतो का नाही ते पाहा!

असे शीर्षांसन करणे प्रत्येकाला जमेलच असे नाही, त्याच प्रकारे बाजारातील गुंतवणूक हीदेखील प्रत्येकाच्याच कुवतीतील बाब नाही, हेही लक्षात ठेवा.

(लेखक हे निर्मल बंग सिक्युरिटीज या गुंतवणूक पेढीचे सल्लागार आहेत)

गुंतवणुकीच्या या

पद्धती आजमावून पाहा

१दीर्घ कालावधीसाठी नियमित स्वरूपात गुंतवणूक करीत राहणे आणि गुंतलेला पसा किमान पाच वष्रे व त्यापेक्षा अधिक काळासाठी गुंतवणुकीत राहू द्यावा.

२ नियमित रूपात (एसआयपी धाटणीने) पसा गुंतविणे शक्य नसल्यास, जसा येईल तसा पसा गुंतवा. पण गुंतलेला पसा १० वर्षांपर्यंत काढला जाणार नाही, याचा अदमास घेऊनच गुंतवणूक करा.

३ जर या दोन्ही पद्धती पसंत पडल्या नसतील, तर तिसरा सर्वात सोपा पर्याय.. मागील एक ते तीन वर्षांचा परतावा हा जर आधीच्या २० वर्षांतील सरासरी परताव्यापेक्षा पाच ते १० टक्क्यांनी सरस असेल तर तो सावधगिरीचा इशारा मानावा. त्या उलट एक ते तीन वर्षांतील परतावा हा आधीच्या २० वर्षांतील सरासरी परताव्याच्या तुलनेत नकारात्मक किंवा १० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास, अशा समयी बाजारात जास्तीत जास्त गुंतवणूक करावी.