मुहूर्ताची खरेदी म्हणून गुरुवारच्या गुरुपुष्यामृतचा एक सुवर्णयोग आहे; मात्र या दिवशी सोने २५ हजाराच्या दराने खरेदी करता येईल की आणखी कमी भावाने? असेच प्रश्न ब्रॅण्डेड दालनांसह ठिकठिकाणच्या सराफी पेढय़ांवर सोनेग्राहकांकडून विचारले जात आहेत.
गुरुवारचा गुरुपुष्यामृत ओलांडला की येत्या महिन्यात १३ मे रोजी अक्षय्य तृतीया हा आणखी एक सुवर्णखरेदीचा मुहूर्त आहेच. शिवाय सध्या लग्नसराईची लगबगही आहे. परंतु नोव्हेंबर २०१२ मध्ये ३२ हजाराला गवसणी घालणारा मौल्यवान धातूचा भाव अक्षय्यतृतीयेआधीच थेट २२ हजारांवर येतो की काय, अशी शंकेची पालही गुंतवणूकदारांच्या मनात चुकचुकत आहे. मुंबईच्या सराफा बाजारात स्टॅण्डर्ड सोने बुधवारी सकाळच्या व्यवहारात १० ग्रॅमसाठी २५,५८० पर्यंत खाली उतरले होते; तर व्यवहार संपताना हा दर प्रति १० ग्रॅम २५,६८० वर स्थिरावला.
गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या सोने दरातील पडझडीने आठवडय़ाभरात १० टक्क्यांहून घट नोंदविली आहे. पाडव्यानंतर सोने तोळ्यामागे ३,२१० रुपयांनी स्वस्त झाले आहे. पाडव्यापूर्वी १० ग्रॅमसाठी ३० हजारांच्या सीमेवर असणारे सोने गुरुपुष्यामृतच्या पूर्वसंध्येला २५ हजारांच्या नजीक आहे. तो मुहूर्ताच्या व्यवहाराला अधिक वाढणार तर नाही ना, अशी शंका खरेदीदारांमध्ये आहे. सोन्याचे दर जसजसे कमी होत आहेत, तसतशी मागणीही १० ते १२ टक्क्यांनी वाढली असल्याचे सराफा पेढी संचालक सांगतात. सुवर्णकारांकडूनही संभ्रमित गुंतवणूकदारांनाही एकदम गुंतवणूक करण्यापेक्षा टप्प्या-टप्प्याने सोने खरेदीचा सल्ला दिला जात आहे. नोव्हेंबर २०१२ मधील उच्चांकी दरांपासून सोने सध्या २० टक्क्यांहून अधिक खालावला आहे. सध्याच्या कमी दरामुळे दागिन्यांची मागणीही ८ ते १० टक्क्यांनी वाढली आहे.
सराफ बाजारातील गेल्या काही दिवसातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. दर आणखी कमी होऊन तोळ्यामागे २२ ते २३ हजार रुपयांवर येतील काय, अशीही विचारणा होत आहे. मौल्यवान धातूचे स्वस्त होणे तसे चांगलेच आहे; मात्र त्यातील अधिक अस्थिरता एकूणच चिंता निर्माण करणारी आहे.
सुधीर पेडणेकर,
अध्यक्ष, मुंबई सुवर्णकार संघ