किंगफिशरमधील २४ टक्के हिस्सा विकून मोठय़ा कर्जसंकटातील हवाई कंपनीला तारण्याचा प्रयत्न प्रवर्तक विजय मल्ल्या यांच्याकडून होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्य प्रवर्तक युनायटेड ब्रुअरीजने आपल्या या अडचणीतील हवाई कंपनीतील काही हिस्सा विकण्यासाठी खाजगी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती कंपनीने मुंबई शेअर बाजाराला दिली आहे.
सुरुवातीला टीपीजी (टेक्सास पॅसिफिक ग्रुप) या खाजगी गुंतवणूक कंपनीने याबाबत रस दाखविल्याचे वृत्त आहे. असे असले तरी टीपीजी १० टक्क्यांच्या वर किंगफिशरमधील हिस्सा घेणार नाही, असेही सांगितले जाते.
किंगफिशरमध्ये खुद्द विजय मल्ल्या (१.८७%) आणि यूबी होल्डिंग, किंगफिशर फिन्व्हेस्ट आदी प्रवर्तक कंपन्यांचा मिळून ३५.८३ टक्के हिस्सा आहे. युनायटेड स्पिरिटने यापूर्वी भांडवली बाजाराच्या माध्यमातून पायोनिअर डिस्टीलरिजला काही समभाग विकण्याचा प्रयत्न केला होता. यूबी समूहाने नुकताच युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडमधील मोठा हिस्सा मद्यनिर्मितीतील जागतिक स्पर्धक कंपनी डिआजियोला विक्री करण्याचा करार केला आहे.
सध्या उड्डाणे स्थगित ठेवणाऱ्या किंगफिशर एअरलाइन्सला येत्या ३० नोव्हेंबपर्यंत नव्याने वाहतूक सेवा पूर्ववत करण्याबाबत विकास आलेख सादर करावयाचा आहे. तर सध्या निलंबित असलेला कंपनीच्या हवाई परवान्याची मुदतही येत्या ३१ डिसेंबर रोजी संपत आहे. कंपनीने गेल्याच आठवडय़ात बँकांनाही आपण लवकरच आर्थिक जुळवणी करीत असल्याचे सांगितले.    

महिंद्र समूहातील सॅन्गयॉन्ग हा कोरियन ब्रॅण्ड येत्या दोन वर्षांत आर्थिकदृष्टय़ा फायद्यात येईल. आर्थिक मंदीमुळे कोरिया आणि युरोपीय बाजारांमध्ये चालू वर्ष या वाहन विक्रीसाठी फारसे चांगले जात नसले तरी भविष्य निश्चितच सकारात्मक आहे.
– प्रविण शाह,
‘महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र’च्या वाहन विभागाचे मुख्याधिकारी (मंगळवारी हैदराबाद येथे)

‘डिआजियो’कडून ५४४१ कोटींच्या समभाग खरेदीचा खुला प्रस्ताव ७ जानेवारीपासून
युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडमधील अतिरिक्त २६ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी ब्रिटनस्थित मद्यकंपनी डिआजियो येत्या ७ जानेवारी रोजी अनिवार्य समभाग खरेदीसाठी खुला प्रस्ताव सादर करणार आहे. कंपनीतील किरकोळ भागधारकांकडून हे समभाग  प्रत्येकी १,१४० रुपये दराने खरेदी करण्यात येतील. अलिकडेच मल्ल्या यांच्या युनायटेड स्पिरिटमधील ५३.४ टक्के हिस्सा डिआजियोने  ११,१६५.५ कोटी रुपयांच्या मोबदल्यात खरेदी करण्याबाबत सामंजस्य केले आहे. खुल्या प्रस्तावातून आणखी २६ टक्के हिस्सा मिळवून युनायटेड स्पिरिटवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न ब्रिटिश मद्यनिर्मिती कंपनीकडून होत आहे. ही प्रक्रिया १८ जानेवारी २०१३ पर्यंत पूर्ण होईल.