सायबर हल्ल्याच्या शक्यतेतून समभागात घसरण

मुंबई : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी विप्रो लिमिटेडने सलग तिसऱ्या सुमारे १०,५०० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी (बाय-बॅक) योजनेची मंगळवारी घोषणा केली. प्रत्येकी ३२५ रुपये किमतीला ही पुनर्खरेदी विप्रोकडून केली जाणार आहे. यापूर्वी विप्रोने २०१६ सालात २,५०० कोटींची आणि २०१७ सालात ११,००० कोटींची पुनर्खरेदी करून आपल्या भागधारकांच्या पदरी भरभरून फायदा दिला आहे. विप्रोच्या समभागाच्या मंगळवारच्या बीएसईवरील २८१.१० रुपये बंद भावाच्या तुलनेत जवळपास १६ टक्के अधिमूल्य भागधारकांना या पुनर्खरेदीतून मिळविता येईल. तर गेल्या सहा महिन्यांतील समभागाच्या २४० रुपये या सरासरी किमतीच्या तुलनेत भागधारकांना ३० टक्के अधिक मूल्य प्रदान केले जाईल. एकूण ३२.३ कोटी समभाग या योजनेतून खरीदले जाणार आहेत.

दमदार नफ्याची कामगिरी

मंगळवारीच विप्रोने मार्च २०१९ अखेर समाप्त तिमाहीसाठी ३८.४ टक्के वाढीसह २,४९३.९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावणारी आर्थिक कामगिरी जाहीर केली. यापूर्वीच्या म्हणजे जानेवारी-मार्च २०१९ तिमाहीत कंपनीने १,८००.८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. कंपनीने सरलेल्या तिमाहीत १५,००६.३ कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले जे वार्षिक तुलनेत ८.९ टक्के वाढले आहे. संपूर्ण २०१८-१९ आर्थिक वर्षांत विप्रोचा १२.६ टक्क्यांच्या वाढीसह ९,०१७.९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

दरम्यान, कंपनीच्या चांगल्या आर्थिक कामगिरीनंतरही मंगळवारी भांडवली बाजारात विप्रोच्या समभागात २.५ टक्क्यांची घसरण झाली. काही कर्मचारी ‘फिशिंग हल्ल्या’ला बळी पडल्याने त्यांच्याकडील माहितीच्या संभाव्य चोरीच्या शक्यतेने विप्रोच्या समभागात ही घसरण झाली. कंपनीचे सुरक्षा जाळे अंशत: भेदले गेल्याची विप्रोनेच अधिकृतपणे कबुली दिली आणि याचे संभाव्य विपरीत परिणाम होणार नाहीत यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना केल्या गेल्या असल्याचे स्पष्ट केले. कंपनीच्या तिमाही कामगिरीची घोषणा होण्यापूर्वी ही सायबर हल्ल्याची घटना प्रकाशात आली.