नवी दिल्ली : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी अझीम प्रेमजी यांनी विप्रो लिमिटेडमधील त्यांच्या भागभांडवली मालकीतून येणाऱ्या लाभातील ३४ टक्के आर्थिक लाभ हे सेवाभावी कार्यासाठी राखून ठेवण्याचा बुधवारी निर्णय जाहीर केला. विप्रोमध्ये प्रेमजी यांची वैयक्तिक समभाग मालकीचे मूल्य सुमारे ५२,७५० कोटी रुपयांचे आहे. प्रेमजी यांच्या या नव्या निर्णयाने ‘अझीम प्रेमजी फाऊंडेशन’ या त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी असलेल्या संस्थेचा एकूण देणगी कोष १.४५ लाख कोटी रुपयांवर गेला आहे. फाऊंडेशनचे विप्रो लिमिटेडमध्ये ६७ टक्क्यांचे आर्थिक स्वामित्वही आहे. अझीम प्रेमजी फाऊंडेशन मुख्यत: शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करते आणि या क्षेत्रात कार्य करीत असलेल्या अन्य ना-नफा तत्त्वावरील संघटनेसाठी बहुवार्षिक वित्तीय अनुदान देते.