फायद्यातील निकाल जाहीर करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची आपल्या कर्मचाऱ्यांप्रतीची उदारता वाढत आहे. विप्रोने तिच्या कर्मचाऱ्यांना बक्षिसीरूपात कंपनीचे समभाग देण्याचे ठरविले आहे. गेल्याच आठवडय़ात याच क्षेत्रातील टीसीएसने कर्मचाऱ्यांना लाभांश देण्याची घोषणा केली होती.
देशातील तिसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान कंपनी विप्रो ही एक कोटी रुपये मूल्य असलेले १८,८१९ समभाग कर्मचाऱ्यांना बहाल करणार आहे. २ रुपये दर्शनी मूल्याचे हे समभाग देण्याचा प्रस्ताव कंपनीच्या संचालक मंडळाने पारित केला असून त्याबाबतची माहिती मुंबई शेअर बाजारालाही कळविण्यात आली आहे.
कंपनीने चौथ्या तिमाहीत २.१ टक्के वाढीचे, २,२८६.५० कोटी रुपयांच्या नफ्याचे निकाल मंगळवारीच जारी केले होते. याचबरोबर कंपनीचे संस्थापक अझीम प्रेमजी यांचे पुत्र रिशाद यांची संचालक मंडळावर नियुक्तीही जाहीर केली होती.
भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल व टाटा समूहातील टीसीएसनेही तिच्या कर्मचाऱ्यांना लाभांश देण्याचा निर्णय गेल्याच आठवडय़ात घेतला होता. भांडवली बाजारातील सूचिबद्धतेच्या दशकपूर्ती निमित्ताने कंपनीच्या ३.१८ लाख कर्मचाऱ्यांसाठी २,६२८ कोटी रुपयांच्या लाभांशाची तरतूद केली आहे. यानुसार, सेवेत किमान एक वर्ष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सप्ताहाच्या वेतन समकक्ष ही भेट देण्यात येणार आहे. सेन्सेक्समध्ये अव्वल स्थान राखणाऱ्या टीसीएसची ऑगस्ट २००४ मध्ये भांडवली बाजारात नोंद झाली होती.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्र गेल्या काही महिन्यांपासून कर्मचारी गळतीला सामोरे जात असल्याने कंपन्या लाभांश, समभाग बक्षीस देऊ करत असल्याचे मानले जात आहे. याचा सर्वाधिक फटका इन्फोसिस कंपनीला बसला आहे.