काहीशा आर्थिक विवंचनेत असलेल्या ऊर्जा क्षेत्राला दिलासा देणारे महत्त्वाचे धोरण येत्या दोन दिवसांत सरकार जाहीर करेल, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले.
‘जागतिक आर्थिक परिषदे’च्या मंचावरून अर्थमंत्र्यांनी एप्रिल २०१६ पासून टप्प्याटप्प्याने कमी करावयाच्या कंपनी कराबरोबरच १ एप्रिल २०१६ पासून वस्तू व सेवा ही देशव्यापी समान करपद्धती लागू करण्याचे आश्वासन दिले. वस्तू व सेवा कराला होत असलेल्या राजकीय विरोध असला तरी जेटली यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या विधेयकाचा मार्ग सुलभ होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
मोठय़ा कर्जाच्या भाराखाली असलेल्या ऊर्जा क्षेत्रात आर्थिक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे धोरण आखण्यात आले असून ते लवकरच जाहीर केले जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. एकदा का हे धोरण जाहीर झाले की या क्षेत्रातील खासगी कंपन्यांही त्यात सहभागी होतील.
‘भारतीय औद्योगिक महासंघा’च्या (सीआयआय) माध्यमातून आयोजित या वार्तालापात जेटली यांनी देशाच्या विद्यमान अर्थव्यवस्थेचा आढावाही घेतला. अर्थव्यवस्थेतील कळीचा मुद्दा असलेल्या निर्मिती क्षेत्रात वाढ नोंदली जात असून अप्रत्यक्ष कर संकलनातील भक्कम वाढीमुळे सरकारच्या महसुली उत्पन्नाबाबत खूपच सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
जलद नागरी विकासासाठी एक खिडकी योजना : नायडू
देशातील नागरी विकासात्मक प्रकल्पांना जलदगतीने मंजुरी मिळण्यासाठी लवकरच एक खिडकी योजना अस्तित्वात येणार असून यामुळे घरांची उभारणी लवकर पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय नागरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला. नागरी विकासात्मक प्रकल्पासाठी होणाऱ्या मंजुरी विलंबाबाबत आपण स्वत: लक्ष घालत असून चालू महिनाअखेपर्यंत तिच्या सुलभतेसाठीची दिशा स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. एक खिडकीच्या माध्यमातून प्रकल्पांना मंजुरी देण्याचा सरकारचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भविष्यात आर्थिक सुधारणा
घडताना दिसाव्यात : राहुल बजाज
बिहारमधील विधानसभेचे निकाल काहीही लागो.आर्थिक सुधारणांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम यापुढेही कायम राहील. भाजपा सरकार तसेच अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आपल्याला विश्वास असून ते आर्थिक सुधारणा भविष्यात नक्कीच राबवतील. आर्थिक सुधारणा अद्याप लागू झालेल्या नाहीत, असे मत व्यक्त करणाऱ्यांबरोबर आपण सहमत आहोत. मात्र नजीकच्या भविष्यात त्या प्रत्यक्षात येताना नक्कीच दिसतील, असे मत बजाज उद्योग समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी व्यक्त केले.