करोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांची देशव्यापी टाळेबंदी लागू केली असली तरी बँकांचा समावेश अत्यावश्यक सेवांच्या यादीत केला असल्याने या कालावधीत बँकांच्या शाखा ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू आहेत. परंतु संचारबंदीच्या काळात वाहतूक तसेच सुरक्षाविषयक कोणत्याही सुविधांविना बँक कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

बँकाच्या शाखा सर्व भागात असल्या तरी कर्मचाऱ्यांना घरापासून नजीकच्या शाखेत जाऊन तेथे तातडीच्या कामात योगदान देण्याची मुभा दिली गेली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये तर मध्यवर्ती स्तरावरून या संबंधाने कोणत्याही स्पष्ट सूचना नाहीत. त्या त्या स्तरावर परिस्थिती पाहून सोयीचा ठरेल असा निर्णय क्षेत्रीय स्तरावरच घेतले गेले आहेत. या गोंधळामुळे अनेक ठिकाणी बँकेने कर्मचाऱ्यांची सोय न बघता त्यांना त्यांच्या मूळ शाखेत उपस्थित राहण्याची सक्ती केली आहे. बँकेत जाण्यायेण्यासाठी बँक व्यवस्थापनाकडून प्रवासाची कुठलीही सोय उपलब्ध नसल्याने बँक कर्मचारी उपलब्ध सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या वाहनातून प्रवास करतांना दिसत आहेत.

करोना विषाणू संक्रमित होण्याला प्रतिबंध म्हणून गर्दीला टाळा असे सरकार जरी म्हणत असले आणि त्यासाठी टाळेबंदीसारख्या कठोर उपाययोजना सुरू असल्या तरी, अनेक शाखांमध्ये खातेधारकांची गर्दी टाळणे अशक्य बनले आहे. शिवाय तिला सामोरे जाणाऱ्या  बँक कर्मचाऱ्यांना कुठलीही सुरक्षा साधने बँक व्यवस्थापनाने दिलेली नसल्याकडे महाराष्ट्र स्टेट बँक कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात लक्ष वेधले आहे.

संपूर्ण टाळेबंदी असूनही राज्यात अनेक भागांमध्ये लक्षणीय संख्येने ग्राहक बँकांच्या शाखांकडे वळत आहेत आणि संक्रमण होणार नाही यासाठी सुरक्षित अंतराच्या नियमाचे उल्लंघनही होत आहे. त्यामुळे बँक शाखेच्या प्रवेशद्वाराजवळ प्रत्येकी एक पोलिस तैनात करण्याची विनंती संघटनेने या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे संघटनेचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले. शाखेत प्रवेश करणाऱ्या व्यक्ती बाधित नाहीत, किमान त्यांच्या शरीराच्या तापमानाची पडताळणी करण्यासाठी आम्ही प्रवेशद्वारावर  वैद्यकीय किंवा निमवैद्यक कर्मचाऱ्यांच्या तैनातीची मागणीही केली आहे. या व्यतिरिक्त बस सेवा पुरेशी नसल्याने बँकेचे काम संपल्यावर घरी जाण्यासाठी दोन अडीच तास वाहनाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे अनेक बँक कर्मचाऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले.

बँक कर्मचारी विमा संरक्षणापासूनही वंचित

महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पगाराच्या आणि पेन्शनच्या रकमेसाठी बँकेच्या शाखांत गर्दी वाढण्याची शक्यता आहे. शिवाय जनधन खात्यांमार्फत समाजातील गरीब घटकांना दरमहा ५०० रुपये, तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन वाटप करण्याची गुरुवारी अर्थमंत्र्यांनी घोषणा केली. यामुळे बँक शाखांमधील परिस्थिती आणखी बिकट होईल. शिवाय हे धनवाटप सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांमार्फत होणार असताना, सरकारने डॉक्टर, निमवैद्यक व आरोग्यनिगा कर्मचाऱ्यांना दिलेल्या विमा संरक्षणापासून, बँक कर्मचारी मात्र वंचित ठेवले गेले आहेत.