आजवर सर्वाधिक सार्वजनिक सुट्टय़ा असलेला देश म्हणून लौकीक असलेला भारत आता सुट्टय़ांच्या उपभोगाबाबत कामकरी वर्गाकडून सर्वाधिक उपेक्षा असलेला देश बनला असल्याचे एक ताजे सर्वेक्षण सांगते. गमंत म्हणजे भारतातील दोन-तृतीयांशांहून अधिक आस्थापनांच्या प्रमुखांनी सुट्टय़ांबाबत त्यांचे धोरण उदार असल्याचे सांगितले असून, सुट्टी-आराम उपभोगण्यापेक्षा कामाला प्राधान्य देण्याचा प्रघात भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये बळावला असल्याचे आढळून येते. त्यातूनच जागतिक तुलनेत चौथ्या क्रमांकाचा ‘सुट्टी-उपेक्षितां’चा देश बनून तो पुढे आला आहे.
सहल आयोजन सेवांमधील अग्रणी ‘एक्स्पेडिया’ने कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ांविषयक उपभोग व नियोजनाचा अंदाज घेताना, वरिष्ठ व्यवस्थापनाचा या संदर्भातील कलही या सर्वेक्षणातून तपासून पाहिला आहे. गेल्या वर्षभरात भारतीयांचा सरासरी सुट्टी-काल २५ दिवसांवरून २० दिवसांवर घसरला असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. कामाबाबत नसला तर कामावरील हजेरीबाबत तरी भारतीयांमध्ये प्रामाणिकता नव्हे तर उत्तरोत्तर दक्ष बनत चालला असल्याचा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. उल्लेखनीय म्हणजे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या दोन-तृतीयांशाहून अधिक मालकांनी कर्मचाऱ्यांनी सुट्टी देण्याबाबत त्यांच्याकडून कोणतीच आडकाठी केली जात नसल्याचे सांगितले.
जागतिक स्तरावर सप्टेंबर व ऑक्टोबर २०१२ दरम्यान २२ देशांमध्ये राबविल्या गेलेल्या या ऑनलाइन सर्वेक्षणात सुट्टय़ांच्या उपभोगात प्रत्येक देशात वेगवेगळा कल आढळून येतो. जपानमध्ये मूळातच सर्वात कमी म्हणजे वर्षांला केवळ पाच सुट्टय़ाच कामगार वर्गाला मिळतात. अमेरिका आणि मेक्सिकोतील कामगारांना त्यापेक्षा थोडे अधिक म्हणजे वर्षांला केवळ १० सुट्टय़ाच मिळतात, पण कामगारांकडून त्यांचा पूर्ण उपभोग घेतला जात असल्याचे आढळून येते. फ्रान्स आणि स्पेनमध्येही वर्षांला मिळणाऱ्या तीस सुट्टय़ा पुरेपूर उपभोगल्या जातात. त्याचप्रमाणे जर्मन कामगार २८ सुट्टय़ांचा पूर्ण वापर करतो, तर ब्रिटिश, नॉर्वे आणि स्वीडिश कामगार हक्काच्या २५ सुट्टय़ांचा पूर्ण वापर करताना दिसतो. त्याच्या नेमकी उलट प्रवृत्ती आशियाई कामगारांमध्ये आढळून येते.