भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFO (Employees’ Provident Fund Organisation) मधून दिवसाला एक लाखांहून अधिक कर्मचारी पैसे काढून घेत असल्याची माहिती समोर आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर वाढलेली बेरोजगारी आणि आर्थिक संकटामुळे अनेकांनी आता पीएफ खात्यातील पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीएफमधून पैसे काढल्यास करोनाच्या आर्थिक संकाटातून अर्थव्यवस्था सावण्याचे मोठे आव्हान सरकार समोर निर्माण होईल असं चित्र दिसत आहे.

करोनामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेक कंपन्यांनी कर्मचार कपात केली आहे. तर दुसरीकडे नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याची माहिती ईपीएफओच्या अहवालामधून पुढे आल्याचे द मिंटने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.  एक एप्रिलपासून ५५ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी आपल्या पीएफ खात्यामधून निधी काढून घेतला आहे. पेन्शन फंड मॅनेजरच्या माध्यमातून ५५ लाख ८० हजार खातेदारांना १५ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

९ जून ते २९ जून या २०  दिवसांच्या कालावधीमध्ये २० लाख कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पीएफ खात्यावरुन पैसे काढले आहेत. यावरुन सरकारने लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्यानंतरही देशातील कामगार वर्गाला किती मोठा आर्थिक फटका बसला आहे याचा अंदाज बांधता येतो.

एप्रिल महिन्यापासून पीएफ खात्यांमधून काढण्यात आलेल्या एकूण रक्कमेपैकी ६० टक्के रक्कमही कोवीडशी संबंधित नसल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. तर करोनाच्या कालावधीमध्ये पैशांची गरज असल्याने निधी काढम्याची मूभा लॉकडाउनच्या कालावधीमध्ये देण्यात आली होती. मात्र लॉकडाउननंतर बेरोजगारी वाढत गेल्यामुळे पीएफ खात्यामधील पैसे काढण्याचे प्रमाण वाढत असल्याचेही आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

“जवळजवळ ५५ लाख ७० हजारहून अधिक खातेदारांनी पैसे काढले आहेत. हे प्रमाण खूप आहे. यामुळे सध्या करोनाच्या साथीमुळे बाजारावर काय परिणाम झाला आहे याचा अंदाज बांधता येतो,” असं सरकारी अधिकाऱ्याने म्हटलं आहे. “पीएफ खातं असणाऱ्यांना करोनाच्या काळामध्ये फायदा झाला आहे. अचानक मोठ्या रक्कमेची गरज असणाऱ्यांनीही पैसे काढले आहेत. खास करुन मासिक पगार १५ हजारांहून कमी असणाऱ्यांना याचा फायदा झाला आहे. अशा लोकांच्या खात्यावरील ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम त्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना फायदा झाला आहे,” असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

तंत्रज्ञानामुळे पीएफ खातेधारकांना तातडीने पैसे देणे सहज शक्य झाल्याचे रिटायमेंट फंड मॅनेजर्स सांगतात. तंत्रज्ञानामुळे अधिक वेगवान पद्धतीने निधी खातेदारांना मिळाला. जून महिन्यामध्ये ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार पगाराच्या आधारावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार एप्रिलपासून ज्या पीएफ खातेधारकांनी निधी काढला आहे, त्यांच्यापैकी ७४ टक्के खातेधारक हे १५ हजार किंवा त्याहून कमी मासिक पगार असणारे आहेत. तर अंदाजे २४ टक्के खातेधारक हे १५ ते ५० हजार प्रती महिना पगार असणाऱ्या गटातील आहेत. त्याचप्रमाणे ५० हजारांपेक्षा अधिक मासिक पगार असणाऱ्या केवळ दोन टक्के कर्मचाऱ्यांनी निधी काढल्याचे ईपीएफोची आकडेवारी सांगते.

पीएफ खाते असणारे १४ लाख कर्मचाऱ्यांना मासिक पगार मिळत नाहीय किंवा ते बेरोजगार झाले आहेत किंवा त्यांनी राजीनामा दिला आहे असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये निधी काढल्याने या निधीवर मिळणारे व्याजाचा कर्मचाऱ्यांना लाभ घेता येणार नाही. सध्या देशभरातील पाच कोटी ७४ लाखांहून अधिक खाती ही पीएफशी संलग्न आहेत.