महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चर्स – यश फाऊंडेशनच्या दातृत्वसेवेचा चौकार!

आज जागतिक एड्स दिन

मुंबई : रेवती महाजन (नाव बदललेले आहे). वय १९ वर्षे. राहणार चाकण. रेवती ही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. तिचे आई-वडील दोघेही एड्स पॉझिटिव्ह आहेत व तीदेखील बाधित आहे. घरची परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी रेवतीला शाळेमध्ये टाकले. सर्व काही व्यवस्थित चालू असताना रेवतीच्या वडिलांचे निधन झाले व रेवतीची जबाबदारी तिच्या आईच्या अंगावर येऊन पडली.

रेवती ही लहानपणापासून यश फाऊंडेशनमध्ये दर महिन्याला ‘न्यूट्रिशियन’ घेण्यासाठी येत असे. त्यामुळे झालेला सर्व प्रकार तिने यश फाऊंडेशनमधील ज्येष्ठांना सांगितला. त्यानंतर तिला दरवर्षी  शैक्षणिक मदत देण्यात आली. ती दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर महेंद्रा कंपनी व यश फाऊंडेशनने तिला शिष्यवृत्तीची मदत करून तिचा प्रवेश महाविद्यालयात करून दिला. रेवती आज पुण्यामधील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. अभियंता बनण्याचे तिचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ पाहत आहे.

वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चर्स व यश फाऊंडेशनमुळे हे शक्य होत असल्याचे चित्र आहे.

मंगळवारच्या जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर तिच्याशी संवाद साधला असता ती म्हणते, वडिलांचे निधन झाल्यानंतर माझे पुढचे शिक्षण होईल का नाही याबाबत मला चिंता होती. परंतु यश फाऊंडेशन व महिंद्र कंपनीने दरवर्षी शैक्षणिक मदत केली. कदाचित या दोन्ही संस्था माझ्यामागे नसती तरच माझे अभियंता बनण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले असते. आज मी पुण्यासारख्या शहरांमध्ये चांगल्या महाविद्यालयात अभियंत्याचे शिक्षण घेत आहे, असेही रेवतीने सांगितले.

महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चर्स व यश फाऊंडेशन यांच्यावतीने एच.आय.व्ही./एड्स जनजागृती कार्यक्रम चाकण शहर तसेच पूर्ण खेड तालुक्यात २०१६ वर्षांपासून सुरू असल्याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाव्दारे चाकण शहर व खेड तालुक्यातील आतापर्यंत २,७४,१६२ लोकांपर्यंत जनजागृती करण्यात संस्थेला यश मिळाले आहे, असे यश फाऊंडेशनचे रवींद्र पाटील यांनी सांगितले.

करोनाकाळात किराणा वाटप 

करोना-टाळेबंदी दरम्यान एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्या व्यक्ती व बालकांवर उपासमारीची वेळ येऊ नये आणि त्यांनी या परिस्थितीत त्यांचे आरोग्य सांभाळावे व करोनाचा संसर्गापासून बचाव व्हावा या उद्देशाला साध्य करण्यासाठी उभय संस्थांमार्फत चाकण, खेड शहरातील २,५०० स्थलांतरित कामगार आणि २४५ एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्या व्यक्ती व बालक यांना जीवनावश्यक शिधा वाटप सामाजिक अंतर नियम पालन करून वाटप केल्याचे सांगण्यात आले. स्थलांतरित कामगारांना जेवणाचे डब्बे, पाणी सुविधा देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.