भारतीय अर्थव्यवस्था आगामी २०१५ आर्थिक वर्षांत ६.४ टक्के दराने वाढ दर्शवेल आणि संबंध दक्षिण आशियाई क्षेत्राच्या आर्थिक उन्नतीत तिचे योगदान राहील, असा विश्वास संयुक्त राष्ट्राच्या अहवालानेही व्यक्त केला आहे. बहुप्रतीक्षित रचनात्मक सुधारणांची वाट खुली होऊन भारताची आर्थिक कामगिरी चमकदार राहण्याचा आशावाद व्यक्त केला आहे.
दक्षिण आशियाई तसेच दक्षिण-पश्चिमी आशियाई देश २०१५ सालात सरासरी ५.३ टक्क्य़ांचा आर्थिक वृद्धिदर अनुभवतील, जो गेल्या चार वर्षांतील उच्चांक असेल, असा संयुक्त राष्ट्राचा होरा आहे. ही सकारात्मकता भारतातील आर्थिक प्रगतीबाबत वाढलेल्या आशेने आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक आयोगा (एस्कॅप)ने ‘आशिया-पॅसिफिक २०१४ वर्ष सांगता सर्वेक्षणा’त मत व्यक्त केले आहे. विद्यमान २०१५ सालात भारतीय अर्थव्यवस्था आधीच्या वर्षांतील ५.५ टक्क्य़ांच्या तुलनेत ६.४ टक्के दराने प्रगती करीत असल्याचे आढळून येईल, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. ‘‘नरेंद्र मोदी सरकारकडून सुधारणांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पडलेल्या पावलांतून ग्राहक तसेच व्यवसायजगताचा विश्वास २०१४ सालच्या उत्तरार्धात बळावला आहे. जी आर्थिक वृद्धीला पूरक बाब ठरली आहे,’’ अशी कौतुकाची पावतीही या अहवालाने नव्या सरकारला बहाल केली आहे.