एकीकडे देशस्तरावर दीर्घ काळ सुरू राहिलेली टाळेबंदी आणि करोना आजारसाथीमुळे कुटुंब आणि कंपन्यांच्या मिळकतीला बसलेला फटका यांचे प्रतिबिंब म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेला कधी नव्हे इतक्या वाईट दिवसांचा सामना करावा लागेल. देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) विद्यमान आर्थिक वर्षांत ९.६ टक्के घसरेल, असे भाकीत गुरुवारी जागतिक बँकेने केले.

जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) यांच्या एकत्रित वार्षिक बैठकीआधी दक्षिण आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांवर केंद्रित हा अहवाल आला आहे. मागील पाच वर्षे सहा टक्के दराने वाढणारे हे क्षेत्र चालू वर्षांत ७.७ टक्के आक्रसण्याचे त्याचे भाकीत आहे.

भारतातील स्थिती अपवादात्मक आणि यापूर्वी कधीही पाहिली गेली नाही इतकी वाईट आहे, असे जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ हॅन्स टिमर यांनी सांगितले. भारताच्या नजीकच्या भविष्यासंबंधीचा दृष्टिकोनही भयानक आहे, असे त्यांनी नमूद केले.