मागील एका वर्षात करोना महामारी आणि दीर्घकाळ सुरू राहिलेल्या टाळेबंदीचे गंभीर घाव सोसूनही भारतीय अर्थव्यवस्थेने त्यातून आश्चर्यकारक उभारी दाखविली असली तरी, अद्याप संकट पुरते सरलेले नाही, असे निरीक्षण जागतिक बँकेने ताज्या अहवालात नोंदविले आहे. हे पाहता देशाच्या वास्तविक आर्थिक विकास दरात वाढीसंबंधीचा अंदाज तिने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी किमान ७.५ टक्के ते कमाल १२.५ टक्के अशा रुंद खिडकीतून व्यक्त केला आहे.

जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) यांच्या संयुक्त वार्षिक बैठकीआधी प्रसृत दक्षिण आशियाई देशांच्या आर्थिक दृष्टिक्षेपावरील या महत्त्वपूर्ण टिपणांत, करोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू होण्याआधीच भारतीय अर्थव्यवस्था मंदावली होती, असे निरीक्षणही नोंदवले आहे. २०१६-१७ मध्ये नोंदविला गेलेला ८.३ टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी वाढ २०१९-२० मध्ये ४ टक्क्यांवर रोडावल्याचे दिसून आल्याचे या जागतिक बँकेने म्हटले आहे.

साथीवर पूर्ण नियंत्रण त्याचप्रमाणे आर्थिक धोरणाच्या आघाडीवरील प्रगती या संबंधाने कायम असलेली अनिश्चितता पाहता, जीडीपीवाढीचा दरही ७.५ ते १२.५ टक्क्यांच्या रुंद खिडकीत कमी-जास्त दिसून येऊ शकेल. अर्थात अर्थव्यवस्थेवरील सकारात्मक परिणाम हा सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेची कामगिरी नजीकच्या भविष्यात किती प्रभावी ठरेल, यावरही अवलंबून असेल असे हे टिपण सांगते.