06 August 2020

News Flash

जागतिक बँकेचे भारताला विक्रमी कर्ज

तिमाहीत निम्मी रक्कम वितरित; लघुउद्योगांचा वाटा अधिक

संग्रहित छायाचित्र

जागतिक बँकेने गेल्या वर्षभरात सर्वाधिक कर्ज रक्कम भारताला उपलब्ध करून दिली असून तरतुदीपैकी निम्मी रक्कम करोना संकट तिमाहीत वितरित केली आहे. सामाजिक तसेच आरोग्य क्षेत्राबरोबर या आंतरराष्ट्रीय अर्थसाहाय्याचा अधिक लाभ देशातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाला झाला आहे.

जुलै २०१९ ते जून २०२० असे जागतिक बँकेचे वित्त वर्ष मंगळवारीच संपुष्टात आले. या दरम्यान जागतिक बँकेने भारताला एकूण ५.१३ अब्ज डॉलरचा कर्जपुरवठा केला आहे. पैकी २.७५ अब्ज डॉलर रक्कम ही गेल्या तिमाहीतच वितरित करण्यात आली आहे.

मार्च २०२० अखेरीस करोना आणि टाळेबंदीचे संकट देशात उग्र बनल्यानंतर जागतिक बँकेने गेल्या तिमाहीत उपलब्ध करून दिलेल्या एकूण २.७५ अब्ज डॉलरपैकी सर्वाधिक १.७५ अब्ज डॉलर देशातील लघुउद्योग क्षेत्राला मिळाले आहेत.

गेल्या वित्त वर्षांत भारताला कर्ज स्वरूपात देण्यात आलेली मदत ही दशकातील विक्रमी असल्याची माहिती जागतिक बँकेचे भारतातील संचालक जुनैद कमाल अहमद यांनी दिली. मावळत्या वित्त वर्षांचा आढावा घेतानाच भारतासाठीच्या आगामी अर्थसाहाय्याची माहिती अहमद यांनी बुधवारी निवडक पत्रकांना वेबसंवादाद्वारे दिली. चालू वर्षांसाठी भारताकरिता ४ अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग आपत्कालीन प्रतिसाद कार्यक्रमांतर्गत जागतिक बँके च्या संचालक मंडळाने ७५ कोटी डॉलरच्या अर्थसाहाय्याला मंजुरी दिली असून त्याचा लाभ १५ लाख लघुउद्योगांना होईल, असेही ते म्हणाले. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात ३० टक्के  व निर्यातीत ४० टक्के हिस्सा राखणाऱ्या, १५ ते १८ कोटी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या लघुउद्योग क्षेत्राला करोना-टाळेबंदीच्या संकटात जागतिक बँके च्या आर्थिक हातभाराचा लाभ होईल, असा विश्वास जुनैद अहमद यांनी व्यक्त केला.

नियमित व पारंपरिक पतपुरवठय़ाच्या माध्यमातून आजघडीला देशातील अवघ्या ८ टक्के  लघुउद्योगांना निधी उपलब्ध होत असून भारतातील केंद्र सरकारच्या करोना कालावधीतील आर्थिक उपाययोजना या क्षेत्रासाठी पूरक ठरतील, असे नमूद करत जागतिक बँकेच्या सहकार्याने, केंद्र सरकारच्या हमीद्वारे तसेच स्थिर व नियमित व्यवसाय असलेल्या लघू उद्योजकांना देशातील गैरबँकिंग वित्त संस्था, सूक्ष्म वित्त संस्थांच्या माध्यमातून चालू वर्षांतही कर्जवाटप होईल, असे अहमद यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 12:17 am

Web Title: world banks record loan to india abn 97
Next Stories
1 समभाग, फंड खरेदी महाग
2 लॉकडाउनमुळे भारतीय कर्मचाऱ्यांचे हाल… पीएफ खात्यांची आकडेवारी पाहून व्हाल थक्क
3 आजपासून बँकिंग नियमांत झाले ‘हे’ मोठे बदल
Just Now!
X