आजपासूनच्या दावोसमधील परिषदेत पंतप्रधानांसह सहभाग

भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या प्रवासाबाबत केंद्र सरकारकडून जाहीर होणाऱ्या आकडेवारीमुळे साशंकता निर्माण झाली असतानाच भारतीय उद्योग जगताकडून मात्र ऐन जागतिक आर्थिक परिषदेच्या तोंडावर स्तुतीसुमने उधळली जात आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या परिषदेत भारतीय अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा मांडणार आहेत. नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर या काहीसे अयशस्वी मानले जाणाऱ्या पावलांचे समर्थन ते यावेळी करण्याची शक्यता आहे.

कोटक महिंद्र बँकेचे उपाध्यक्ष उदय कोटक यांनी म्हटले आहे की, नवा भारत म्हणून देशाला सद्यस्थितीत विकासाला उत्तम संधी आहे. भारतीय बँकिंग तर प्रगतीपथावर असून देशाच्या अर्थव्यवस्थेतील ही एक महत्त्वाची यंत्रणा आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही एक खुली अर्थव्यवस्था असल्याचे आता जगाला या मंचावरून सांगण्याची गरज आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या अर्धवार्षिकात देशाचा विकास दर ७ टक्के असेल. तर संपूर्ण चालू वित्त वर्षांकरिता अर्थव्यवस्थेचा वेग ६.५ टक्क्य़ांपुढेच असेल. देशातील विविध क्षेत्रातील कार्य प्रगतीपथावर असून ग्राहकांची क्रयशक्तीही विस्तारत आहे. औद्योगिक उत्पादन, पतपुरवठा, वाहन विक्री हे उंचावणारे आकडे त्याची प्रचिती देतात.