News Flash

भारतीयांचा सोने-हव्यास संकोचला!

चढे आयात शुल्क आणि पुरवठय़ावरील र्निबधांमुळे भारतीयांची सोन्याची हौस कमी झाली असून, मौल्यवान धातूचे दर किमान पातळीवर राहूनही देशाची सोन्याची मागणी घसरली आहे.

| May 21, 2014 01:05 am

चढे आयात शुल्क आणि पुरवठय़ावरील र्निबधांमुळे भारतीयांची सोन्याची हौस कमी झाली असून, मौल्यवान धातूचे दर किमान पातळीवर राहूनही देशाची सोन्याची मागणी घसरली आहे. जानेवारी ते मार्च या २०१४ च्या पहिल्या तिमाहीत भारताची सोन्याची मागणी थेट २६ टक्क्यांनी रोडावत १९०.३० टनवर आली आहे.
एकूण २०१४ मध्ये भारताची सोन्याची मागणी १००० टनपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
‘जागतिक सुवर्ण परिषदे’च्या ‘सुवर्ण मागणी कल’ अहवालानुसार, २०१३ मधील पहिल्या तिमाहीत सोन्याची मागणी तब्बल २५७.५० टन होती. मूल्याच्या बाबतही सोन्याची मागणी ३३ टक्क्यांनी घसरून यंदाच्या जानेवारी ते मार्चदरम्यान वर्षभरापूर्वीच्या ७३,१८३.६० वरून ४८,८५३ कोटी रुपयांवर आली आहे.
आयात शुल्क कमी होऊन सोने मागणी वाढणार
चालू खात्यावरील वाढती तूट आवरण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने वेळोवेळी मौल्यवान धातूवरील आयात शुल्क चढे ठेवले. आघाडीच्या अध्यक्षा व वाणिज्य व व्यापारमंत्री आनंद शर्मा यांनीही शुल्क कपातीसाठी आग्रह धरला होता. मात्र सरकारी तिजोरीवरील भार पाहता अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी सरकार हे शुल्क कमी करण्याची शक्यता आहे. सोने-चांदी व्यवसायाचा गुजराथी बांधवांशी निकटचा संबंध असून त्यांच्या हितासाठी या सरकारकडून हा निर्णय घेतला जाण्याची अटकळ आहे. नव्या सरकारचा अर्थसंकल्प येत्या महिन्या-दोन महिन्यांत येणार असून, त्यात याबाबतचा निर्णय झाल्यास २०१४च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्यासाठीची मागणी पुन्हा वाढेल.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी स्थिर
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी २०१४च्या पहिल्या तिमाहीत स्थिर राहिली आहे. जानेवारी-मार्चदरम्यान जागतिक पातळीवर सोन्याची १०७४.५० टन मागणी नोंदली गेली आहे. ती गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या १०७७.२० टनपेक्षा किरकोळ कमी आहे. आशियाई देशांकडून फारसा प्रतिसाद न राहिल्याने एकूण जागतिक सोने मागणी स्थिर राहिल्याचे मत जागतिक सुवर्ण परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक मार्कस ग्रुब यांनी व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दागिन्यांची मागणी तीन टक्क्यांनी वाढून ५७१ टन झाली आहे. सोन्याच्या कमी मूल्यामुळे हा कल राहिल्याचे परिषदेच्या ‘सोने मागणी कल’ अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये चीनसारख्या मौल्यवान धातूसाठी सर्वाधिक मागणी असणाऱ्या देशातून १० टक्के अधिक प्रतिसाद लाभला आहे. जागतिक स्तरावर सोन्याची नाणी आणि बार यांची मागणी ३९ टक्क्यांनी घसरून २८३ टन झाली आहे.

चालू खात्यावरील तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सोन्यावरील  आयात शुल्क नेहमीच वाढते ठेवले. या दरम्यान देशात चोरटय़ा मार्गाने मात्र सोन्याची आयात कायम राहिली. संयुक्त अरब अमिरातमधील सोन्याची १३ टक्क्यांनी वाढलेली मागणी हेच स्पष्ट करते. या देशातून भारतात मोठय़ा प्रमाणात छुप्या पद्धतीने सोने आयात होते.   
 ’ पी. आर. सोमसुंदरम,
व्यवस्थापकीय संचालक, जागतिक सुवर्ण परिषद (भारत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 1:05 am

Web Title: world gold council gold demand trends report released
टॅग : Gold
Next Stories
1 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची गरज नाही: राजन
2 रिझव्‍‌र्ह बँकेची जनाभिमुखता? एक अनुभव
3 इंडिगोच वरचढ!
Just Now!
X