News Flash

कांडला ते गोरखपूर, जगातल्या सगळ्यात लांब पाइपलाइनचा मार्ग खुला

भारताच्या एलपीजीच्या एकूण मागणीपैकी तब्बल 25 टक्के मागणी वाहण्याची पाइपलाइनची क्षमता

जगातली सगळ्यात मोठी एलपीजी पाइपलाइन टाकण्यासाठी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्यांनी करार केला आहे. गुजरातमधल्या कांडलापासून ते उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूरपर्यंत एलपीजीची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे.

इंडियन ऑइलने या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असून 2,757 कि.मी लांबीची ही पाइपलाइन तीन राज्यांना पश्चिम किनारपट्टीशी जोडणार असल्याचे सांगितले. या तीन सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांच्या 22 एलपीजी प्रकल्पांना गॅसचा पुरवठा होणार आहे. सोमवारी दिल्लीमध्ये या संदर्भात तिनही कंपन्यांनी सहकार्य करारावर सह्या केल्याचे सांगण्यात आले आहे.

कांडला ते गोरखपूर या पाइपलाइनसाठी 10 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. इंडियन ऑइलचा 50 टक्के व भारत पेट्रोलियम व हिंदुस्तन पेट्रोलियमचा प्रत्येकी 25 टक्के हिस्सा असलेल्या संयुक्त कंपनीच्या माध्यमातून ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. कोयली व बिना या दोन तेलशुद्धीकरण प्रकल्पांमधून तसेच पश्चिम किनारपट्टीवरील तीन आयात टर्मिनल्सवरून या पाइपलाइनद्वारे एलपीजी पुरवण्यात येणार आहे. गुजरातमधले तीन, मध्यप्रदेशमधले सहा व उत्तर प्रदेशातल्या 13 बॉटलिंग प्लांट्सना एलपीजीचा पुरवठा होणार आहे.

याखेरीज या पाइपलाइनच्या माध्यमातून राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशमधल्या आणखी 21 बॉटलिंग प्लांट्सना रस्ते बांधणीच्या माध्यमातून एलपीजी पुरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पूर्ण झाल्यावर या पाइपलाइनच्या माध्यमातून वर्षाला 8.25 दशलक्ष मेट्रिक टन इतक्या एलपीजीची वाहतूक शक्य होणार आहे. भारताच्या एलपीजीच्या एकूण मागणीपैकी तब्बल 25 टक्के मागणी पूर्ण करण्याची ही क्षमता असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 6:29 pm

Web Title: worlds longest lpg pipeline kandla gorakhpur ioc hpcl bpcl
Next Stories
1 ‘अवजड उद्योगात सक्षमीकरणाद्वारे रोजगारनिर्मिती’
2 रिझव्‍‌र्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक सुरू
3 अर्थव्यवस्थेला घेरी..
Just Now!
X