28 November 2020

News Flash

जीडीपीचा दर उणे २४ टक्के; चेतन भगत म्हणाले, “तात्काळ…”

केवळ कृषी क्षेत्रात झाली सकारात्मक वाढ

आधीच संथगतीने वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेला करोनाचा मोठा फटका बसला. भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचं सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनं स्पष्ट केलं. तिमाहीगणिक आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या १९९६ पासून सुरू झालेल्या प्रघातापासून, नकारात्मक आर्थिक विकासाची ही सर्वात भयाण आकडेवारी असून एकूणच आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांमधील सर्वात वाईट कामगिरीही असल्याचं समोर आलं आहे. आता यावरून अनेक स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, यावरून प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीदेखील सरकारवर टीका केली आहे.

“गेल्या तिमाहित जीडीपीचा दर आक्रसून उणे २४ टक्क्यांवर आला आहे. जीडीपीचा दर पूर्वपदावर आणण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्याची गरज आहे. याचा सर्वांवर प्रभाव पडेल,” असं मत चेतन भगत यांनी व्यक्त केलं. त्यांनी यासंदर्भात ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केलं. त्यांचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसंच अनेकांनी त्यांच्या या ट्विटवर आपली प्रतिक्रियाही दिली आहे.

तिमाहीगणिक आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या १९९६ पासून सुरू झालेल्या प्रघातापासून, नकारात्मक आर्थिक विकासाची ही सर्वात भयाण आकडेवारी असून, एकूणच आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांमधील सर्वात वाईट कामगिरीही आहे. अर्थविश्लेषकांनी वर्तविलेल्या पूर्वअंदाजांपेक्षा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेची अधोगती मोठी असल्याचे ही आकडेवारी दर्शविते. ही चिंतेची बाब मानली जाते. त्यामुळे यातून बाहेर पडण्यालाही वेळ लागेल या भीतीने भांडवली बाजारातही सोमवारच्या व्यवहारात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांमध्ये मोठी घसरगुंडी दिसून आली.

कृषी क्षेत्रात सकारात्मक वाढ

अपेक्षा केली जात होती त्याप्रमाणे, केवळ कृषी क्षेत्रात एप्रिल-जून तिमाहीत सकारात्मक वाढ राहिली, असे राष्ट्रीय सांख्यिकी विभागाची (एनएसओ) आकडेवारी दर्शविते. मात्र अर्थव्यवस्थेच्या उत्पादन, बांधकाम आणि सेवा क्षेत्र या इतर अंगांमध्ये कमालीचा उतार दिसला आहे. करोना प्रतिबंध म्हणून २५ मार्च २०२० पासून सुरू झालेल्या देशव्यापी टाळेबंदीने व्यापार-उदिमासह, सामान्य जनजीवनावर साधलेल्या विपरीत परिणामाचेच प्रतिबिंब अर्थव्यवस्थेतील या भीषण उतारात प्रतिबिंबित झाले आहे, अशी ‘एनएसओ’ची स्पष्टोक्ती आहे.

देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (२०११-१२ च्या स्थिर किमतीनुसार) २०२०-२१ आर्थिक वर्षांच्या प्रथम तिमाहीत २६.९० लाख कोटी रुपये अंदाजण्यात आले आहे, जे २०१९-२० च्या प्रथम तिमाहीत ३५.३५ लाख कोटी रुपये होते. म्हणजे २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत दिसलेल्या ५.२ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत ते २३.९ टक्क्यांनी आकुंचन पावले आहे, असे ‘एनएसओ’ने दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे.

करोनापूर्वीही घट

करोनाच्या प्रादुर्भावापूर्वीही म्हणजे जानेवारी ते मार्च २०२० तिमाहीत अर्थव्यवस्थावाढीचा दर हा आठ वर्षांच्या नीचांकाला म्हणजे ३.१ टक्के नोंदविला गेला होता, तर मागील वर्षांत एप्रिल ते जून २०१९ तिमाहीत जीडीपीवाढीचा दर ५.२ टक्के असा होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 12:51 pm

Web Title: writer chetan bhagat reaction on gdp contracted by massive 23 9 says will affect everyone twitter tweet jud 87
Next Stories
1 अर्थव्यवस्थेचा कडेलोट
2 सेन्सेक्सची गटांगळी
3 नवी मुंबई विमानतळ प्रकल्प आता अदानी समूहाकडे!
Just Now!
X