यश बिर्ला समूहाचे अध्यक्ष, उद्योगपती व ‘पेज ३’ संस्कृतीमध्ये वावर असलेल्या यशोवर्धन (यश) बिर्ला यांना सार्वजनिक क्षेत्रातील युको बँकेने कर्जबुडवे म्हणून जाहीर केले आहे. ६७.६५ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाप्रकरणी यश बिर्ला यांच्या छायाचित्रासह युको बँकेने अखेर सोमवारी विविध माध्यमांतून ही माहिती प्रसारित केली.

विशेष म्हणजे यश बिर्ला यांचे चुलत आजोबा जी. डी. बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखालीच १९४३ मध्ये स्थापन झालेल्या युको बँकेने ही कारवाई केली आहे. प्रसिद्ध व्यक्तीचे अशा प्रकारे छायाचित्र प्रसारित होण्याचा हा निराळा प्रकार मानला जातो. कोलकातास्थित समूहाला बँकेच्या मुंबईतील शाखेने कर्ज मंजूर केले होते.

यश बिर्ला यांच्याकडून येणी असलेली रक्कम ३ जून २०१९ अखेर ६७.६५ लाख रुपये असल्याचे युको बँकेने म्हटले आहे. बिर्ला यांच्या बिर्ला सूर्या लिमिटेडला सौर ऊर्जा क्षेत्रातील उत्पादन निर्मितीकरिता बँकेने १ कोटी रुपयाचे कर्ज मंजूर केले होते. पैकी उर्वरित रक्कम थकीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यश बिर्ला समूहातील झेनिथ बिर्ला आणि बिर्ला पॉवर सोल्युशन्सच्या मुदत ठेवींबाबतची एक तक्रार २०१३ मध्ये मनीलाइफला प्राप्त झाली होती. समूहातील आठपैकी केवळ एकाच कंपनीने मार्च २०१३ पासून नकारात्मक परतावा दिला आहे. समूहातील बिर्ला कॉटसिन इंडिया, बिर्ला श्लोका एज्युटेक व झेनिथ बिर्ला या तीन कंपन्यांविरुद्ध तपास करण्याचे आदेश गंभीर गुन्हे तपास कार्यालयाने यंदाच्या जानेवारीमध्ये दिले होते.