रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर लादलेले निर्बंध आज संध्याकाळपासून हटवण्यात येणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता बँकेवरील सर्व निर्बंध हटवण्यात येणार असून सामान्य कामकाजालाही सुरूवात होणार आहे. यानंतर गुरूवार दि. १९ मार्चपासून येस बँकेचे ग्राहक बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन सर्व बँकींग सेवांचा लाभ घेऊ शकतात. याव्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेने येस बँकेच्या खातेदारांवर घातलेली रोख रक्कम काढण्याची मर्यादाही हटवण्यात येणार आहे. ५ मार्च रोजी रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध लादले होते.

मंगळवारी संध्याकाळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बँकेकडून याबाबत माहिती देण्यात आली. तसंच येस बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध १८ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून हटवण्यात येतील आणि सामान्य कामकाजाला सुरूवात होईल, अशी माहिती स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिली होती. तसंच यापूर्वी येस बँकेकडून ट्विटरवरूनही ग्राहकांना ही माहिती देण्यात आली होती. १९ मार्चपासून देशभरातील १ हजार १३२ शाखांमध्ये ग्राहक येऊ शकतात, असं ट्विट येस बँकेनं केलं होतं.

बँकेचे मुख्याधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, “येस बँकेच्या खातेदारांना बुधवार सायंकाळपासून रक्कम काढणे, भरण्यासह सर्व व्यवहार करता येतील. यामध्ये तंत्रस्नेही माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांचाही समावेश आहे. बँकेच्या खातेदारांना रक्कम देण्यात कोणतीही अडचण येणार नाही.” “बँकेकडे पुरेशी रोकड असून त्यासाठी कोणत्याही सहाय्यावर अवलंबून राहण्याची आवश्यकता बँकेला वाटत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्ज अनियमतेपोटी देशातील चौथ्या मोठय़ा खासगी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने ५ मार्च रोजी आर्थिक निर्बंध घातले होते. यानुसार खातेदारांना निर्बंध कालावधीत, ३ एप्रिलपर्यंत ५०,००० रुपये काढण्याचीच मुभा होती. हे निर्बंध बुधवारपासून मागे घेतले जात असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने नुकतेच जाहीर केले. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यासह येस बँकेचे संचालक मंडळही बरखास्त करण्यात आले होते. स्टेट बँकेचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्यानंतर तेच आता निर्बंध सरल्यानंतर बँकेचे मुख्याधिकारी असतील.
निर्बंध कालावधीत येस बँकेत गुंतवणूक करण्यासाठी आठ विविध बँक, वित्त संस्था पुढे आल्या असून त्यांनी आतापर्यंत १०,००० कोटी रुपये गुंतविले आहेत. स्टेट बँकेने दुसऱ्या टप्प्यात बँकेतील ४२ टक्के हिस्सा विस्तारताना ४९ टक्क्यांपर्यंत नेला आहे.

समभागात सात दिवसांत दहापटीने वाढ
काही तासातच आर्थिक निर्बंध शिथील होणार असल्याच्या घडामोडीचे अपेक्षित पडसाद येस बँकेच्या समभागात मंगळवारी उमटले. बँकेचा समभाग सलग तिसऱ्या व्यवहारात तब्बल ५९ टक्के झेपावत ५८.०९ रुपयांवर पोहोचला. सलग तीन व्यवहारात मिळून हा समभाग १३४ टक्क्यांनी वाढला, तर व्यवहार झालेल्या मागील सात दिवसांत तो दसपटीने वाढला आहे. परिणामी या दरम्यान बँकेचे बाजार भांडवल ८,५७०.५२ कोटी रुपयांनी वाढून १४,९५८.५२ कोटी रुपये झाले.