कर्ज घोटाळ्यामुळे आर्थिक अडचणी आलेल्या येस बँकेच्या ग्राहकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. या संपूर्ण प्रकरणात ईडीनं बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक केलं आहे. दरम्यान हा आर्थिक गैरव्यवहार समोर आल्यानंतर येस बँकेच्या ग्राहकांना पैसे काढताना समस्यांना सामोर जावं लागलं. अखेर शनिवारी रात्री बँकेनं ग्राहकांना दिलासा दिला आहे.

येस बँकेत कर्जवाटपात घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. बँकेतील आर्थिक अनियमितता चव्हाट्यावर आल्यानंतर ईडीनं शुक्रवारी रात्री बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईनंतर राणा कपूर यांना चौकशी ईडीनं ताब्यात घेतलं. शनिवारी दिवसभर त्यांची चौकशी करण्यात आली.  दीर्घकाळ चाललेल्या चौकशीनंतर शनिवारी मध्यरात्री कपूर यांना अटक करण्यात आलं. कपूर यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, शनिवारी रात्री बँकेना चिंतातूर असलेल्या आपल्या ग्राहकांना काहीसा दिलासा दिला आहे. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर एक ट्विट केलं आहे. तुम्ही आता येस बँकेचं डेबिट कार्ड वापरून पैसे काढू शकता. येस बँकेच्या एटीएमबरोबरच इतर बँकांच्या एटीएममधूनही पैसे काढता येईल. संयम दाखवल्याबद्दल आभारी आहोत, असं बँकेनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

येस बँकेच्या कर्जवाटपात आर्थिक नियमितता समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने आरबीआयने कारवाई केली होती. या कारवाईमुळे अर्थविश्वात खळबळ उडाली. त्याचबरोबर सरकारच्या मंजुरीनंतर येस बँकेवर प्रशासकही नियुक्त करण्यात आला. ग्राहकांना पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती.