News Flash

येस बँकेत पुरेशी रोकड

कर्ज अनियमतेपोटी देशातील चौथ्या मोठय़ा खासगी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने ५ मार्च रोजी आर्थिक निर्बंध घातले होते.

संग्रहित छायाचित्र

खातेदारांना आज सायंकाळपासून एटीएममधून रक्कम काढता येणार

येस बँकेच्या एटीएम तसेच बँक शाखांमध्ये पुरेशी रोकड असल्याचा निर्वाळा बँकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी प्रशांत कुमार यांनी मंगळवारी दिला. खासगी बँकेवरील आर्थिक निर्बंध शिथील करण्यात येत असून येस बँकेच्या खातेदार, ठेवीदारांना बुधवार सायंकाळी ६ वाजेपासून रक्कम काढता येणार आहे.

बँकेचे मुख्याधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, येस बँकेच्या खातेदारांना बुधवार सायंकाळपासून रक्कम काढणे, भरण्यासह सर्व व्यवहार करता येतील. यामध्ये तंत्रस्नेही माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांचाही समावेश आहे. बँकेच्या खातेदारांना रक्कम देण्यात कोणतीही अडचण येणार नाही. बँकेकडे पुरेशी रोकड असून त्यासाठी कोणत्याही बा’ा सहाय्यावर अवलंबून राहण्याची आवश्यकता बँकेला वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्ज अनियमतेपोटी देशातील चौथ्या मोठय़ा खासगी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने ५ मार्च रोजी आर्थिक निर्बंध घातले होते. यानुसार खातेदारांना निर्बंध कालावधीत, ३ एप्रिलपर्यंत ५०,००० रुपये काढण्याचीच मुभा होती. हे निर्बंध बुधवारपासून मागे घेतले जात असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने नुकतेच जाहीर केले. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यासह येस बँकेचे संचालक मंडळही बरखास्त करण्यात आले होते. स्टेट बँकेचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्यानंतर तेच आता निर्बंध सरल्यानंतर बँकेचे मुख्याधिकारी असतील.

निर्बंध कालावधीत येस बँकेत गुंतवणूक करण्यासाठी आठ विविध बँक, वित्त संस्था पुढे आल्या असून त्यांनी आतापर्यंत १०,००० कोटी रुपये गुंतविले आहेत. स्टेट बँकेने दुसऱ्या टप्प्यात बँकेतील ४२ टक्के हिस्सा विस्तारताना ४९ टक्क्यांपर्यंत नेला आहे.

समभागात सात दिवसांत दहापटीने वाढ

काही तासातच आर्थिक निर्बंध शिथील होणार असल्याच्या घडामोडीचे अपेक्षित पडसाद येस बँकेच्या समभागात मंगळवारी उमटले. बँकेचा समभाग सलग तिसऱ्या व्यवहारात तब्बल ५९ टक्के  झेपावत ५८.०९ रुपयांवर पोहोचला.   सलग तीन व्यवहारात मिळून हा समभाग १३४ टक्क्यांनी वाढला, तर व्यवहार झालेल्या मागील सात दिवसांत तो दसपटीने वाढला आहे. परिणामी या दरम्यान बँकेचे बाजार भांडवल ८,५७०.५२ कोटी रुपयांनी वाढून १४,९५८.५२ कोटी रुपये झाले.

येस बँकेच्या बुडित कर्जात ९० टक्के भर

खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या ढोबळ बुडित कर्जात गेल्या नऊ महिन्यात तब्बल ९० टक्के भर पडली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१९ दरम्यान बँकेच्या ढोबळ बुडित कर्जाची रक्कम ३६,७६३.७६ कोटी रुपयांपर्यंत फुगली आहे. बँकेने गेल्याच आठवडय़ात खासगी बँक क्षेत्रातील सर्वाधिक तोटा असलेला ताळेबंद जाहीर केला होता.

यानुसार बँकेला डिसेंबर २०१९ अखेरच्या तिसऱ्या तिमाहीत १८,५६० कोटी रुपयांचा तोटा झाला. तर डिसेंबर २०१९ अखेर बँकेचे ढोबळ बुडित कर्ज ४०,७०९.२० कोटी रुपये झाले आहे. वाढत्या थकीत कर्जासाठी तरतूद म्हणून बँकेने २९,५९४ कोटी रुपये चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीच्या ताळेबंदात नमूद केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 12:48 am

Web Title: yes bank enough cash money akp 94
Next Stories
1 दूरसंचार कंपन्यांना ‘एजीआर’ देणी हप्त्याने चुकती करण्याची मुभा
2 Coronavirus : कॅश सोडा, डिजिटल पेमेंट करा; रिझर्व्ह बँकेच्या सुचना
3 करोना धास्ती सप्ताहारंभीही कायम
Just Now!
X