खातेदारांना दिलासा; आणखी दोन खासगी बँकांची गुंतवणूक

येस बँकेच्या पुनरुज्जीवनाला केंद्राने शुक्रवारी हिरवा कंदील दिल्यानंतर, आता या बँकेच्या कारभारावरील निर्बंधही येत्या बुधवारपासून (१८ मार्च) उठविण्यात येतील, असे सरकारने शनिवारी स्पष्ट केले. सध्या बँकेचे प्रशासक म्हणून काम पाहत असलेले प्रशांत कुमार हेच पुनर्रचित बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, असेही स्पष्ट करण्यात आले.

रिझव्‍‌र्ह बँकेने ५ मार्चला आर्थिक डबघाईला आलेल्या येस बँकेवर निर्बंध आणून, ठेवीदारांवर खात्यातून कमाल ५०,००० रुपयेच काढण्याची मर्यादा घातली. त्यावेळी ही मर्यादा ३ एप्रिलपर्यंत लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र १३ मार्च २०२० रोजी राजपत्रात ‘येस बँक पुनर्बाधणी योजना २०२०’ची अधिसूचना प्रसिद्ध केली गेली. त्या अधिसूचनेनुसार, बँकेवरील हे निर्बंध ही पुनर्बाधणी योजना कार्यान्वित झाल्याच्या तिसऱ्या कामकाज दिवसाच्या (म्हणजे १८ मार्च) सायंकाळी ६ वाजल्यापासून संपुष्टात येईल.’ अर्थात ठेवीदारांवरील खात्यातून रक्कम काढण्यास अथवा हस्तांतरित करण्याची मर्यादाही उठविली जाईल.

केंद्राकडून मंजूर येस बँकेच्या पुनर्रचना आराखडय़ानुसार, बँकेत ४९ टक्के भागभांडवली मालकी मिळविणाऱ्या स्टेट बँकेला पुढील तीन वर्षांत २६ टक्क्यांखाली आणता येणार नाही. त्याचवेळी अन्य गुंतवणूकदार तसेच विद्यमान भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीचा ७५ टक्के पुढील तीन वर्षे कालावधीसाठी राखून (लॉक-इन) ठेवावी लागेल. मात्र, येस बँकेच्या १०० पेक्षा कमी समभाग असणाऱ्या छोटय़ा भागधारकांना तीन वर्षांच्या ‘लॉक-इन’ कालावधीपासून मोकळीक दिली गेली आहे.

बंधन, फेडरल बँकेची गुंतवणूक

येस बँकेला तारण्यासाठी स्टेट बँकेच्या ७,२५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबरोबरीनेच आघाडीच्या चार बँकांनी  ३,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक शुक्रवारी जाहीर केली. त्यापाठोपाठ आता बंधन बँक आणि फेडरल बँकेकडून प्रत्येकी ३०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना शनिवारी जाहीर केली. आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी लिमिटेडकडून प्रत्येकी १,००० कोटी रुपये, अ‍ॅक्सिस बँक (६०० कोटी रुपये), कोटक महिंद्र बँक (५०० कोटी रुपये) अशा ३,१०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा यापूर्वीच झाली आहे. शिवाय अन्य व्यक्तिगत गुंतवणूकदारांचे येस बँकेत स्वारस्य असून, त्यांच्या गुंतवणुकीची मात्रा लवकरच जाहीर केली जाईल.

संचालक मंडळाचीही घोषणा

सध्या बँकेवर प्रशासक म्हणून कार्यरत असलेले प्रशांत कुमार हे पुनर्रचित बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. कुमार हे स्टेट बँकेचे निवृत्त मुख्य वित्तीय अधिकारी आहेत. त्यांच्यासह पंजाब नॅशनल बँकेचे माजी अध्यक्ष सुनील मेहता हे बिगर-कार्यकारी अध्यक्ष असतील, तर महेश कृष्णमूर्ती आणि अतुल बेडा हे या बँकेचे बिगर-कार्यकारी संचालक असतील.