संचालक मंडळावरील नियुक्तीवरून ‘रण’ पेटलेल्या नव्या पिढीची खासगी बँक- येस बँकेतील सत्तासंघर्षांचा निकाल ‘फिफ्टी-फिफ्टी’ असा लागला आहे. बँकेचे एक संस्थापक व सध्याचे व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांचे समर्थक असलेल्या तीन नव्या संचालकांच्या नियुक्तीस भागधारकांनी मान्यता दिली आहे; तर दुसरीकडे बँकेचे अन्य एक संस्थापक व अध्यक्ष राहिलेल्या दिवंगत अशोक कपूर यांची कन्या शगुन कपूर-गोगिया यांनाही संचालक मंडळावर घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
देशातील चौथी मोठी खासगी बँक असलेल्या येस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले राणा कपूर यांचे समर्थक मानल्या जाणाऱ्या तीन नव्या संचालकांच्या नावाला सहसंस्थापक स्व. अशोक कपूर यांच्या पत्नी मधू कपूर यांनी आक्षेप घेतला होता. मात्र शनिवारी मतदान पद्धतीने भागधारकांनी दिवाण अरुण नंदा, रविश चोप्रा व एम. आर. श्रीनिवासन यांच्या नावाला सहमती दर्शविली. बँकेच्या एकूण भागधारकांपैकी ५७ टक्के जणांनी या मतदानात भाग घेतला; तर या नव्या नियुक्तीसह तीन नव्या नियमांनाही मतदान करणाऱ्यांपैकी ८० टक्के भागधारकांनी मंजुरी दिली.
बँकेत राणा कपूर यांचा १३.७२ टक्के हिस्सा आहे; तर या नियुक्तीला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या मधू कपूर यांचा १२ टक्के हिस्सा आहे. अशोक व मधू यांची कन्या शगुन व मुलगा गौरव यांचा नव्या नावांना पूर्वीपासून विरोध राहिला आहे. बँकेचे अध्यक्ष राहिलेल्या अशोक कपूर यांचे नोव्हेंबर २००८ मधील मुंबईतील ओबेरॉय हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निधन झाले होते. मधू कपूर या अशोक कपूर यांच्या पत्नी बिंदू कपूर या संख्या भगिनी होत; तर श्रीनिवासन हे सध्या बँकेचे अध्यक्ष आहेत.
दरम्यान, शगुन गोगिया या मधू कपूर यांच्या विवाहीत कन्येला येस बँकेच्या संचालक मंडळावर घेण्यास हरकत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. जे. काठावाला यांनी दिला. शगुन यांना मधू यांची वारसदार संचालक म्हणून नेमण्याची प्रक्रिया राबवावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर बँकेला येत्या २७ जून रोजी संचालक मंडळाची बैठक घेण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी ही बैठक जुलैमध्ये होणार होती.