येस बँकेच्या खातेधारकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. येस बँकेच्या सर्व सेवा पूर्वीसारख्या सुरळीत चालू झाल्या आहेत. येस बँकेने टि्वटरवरुन ही माहिती दिली आहे. “आमच्या सर्व बँकिंग सेवा सुरु झाल्या आहेत. संयम दाखवल्याबद्दल आणि सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद” असे येस बँकेने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

देशाची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध घातल्यामुळे खातेधाराकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे आरबीआयला हा निर्णय घ्यावा लागला होता. बँकेच्या व्यवस्थानपनाला आवश्यक भांडवल उभारणी करता येत नाहीय आणि आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे आरबीआयने येस बँकेवर पाच मार्च रोजी निर्बंध घातले. खातेदारांना बँकेतून फक्त ५० हजारापर्यंत रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली होती.

मंगळवारी संध्याकाळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत येस बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध १८ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून हटवण्यात येतील आणि सामान्य कामकाजाला सुरूवात होईल, अशी माहिती स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिली होती.

स्टेट बँकेचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्यानंतर तेच आता निर्बंध सरल्यानंतर बँकेचे मुख्याधिकारी असतील.

निर्बंध कालावधीत येस बँकेत गुंतवणूक करण्यासाठी आठ विविध बँक, वित्त संस्था पुढे आल्या असून त्यांनी आतापर्यंत १०,००० कोटी रुपये गुंतविले आहेत. स्टेट बँकेने दुसऱ्या टप्प्यात बँकेतील ४२ टक्के हिस्सा विस्तारताना ४९ टक्क्यांपर्यंत नेला आहे.