मुंबई : गेले वर्षभर सातत्याने मूल्यआपटी नोंदविणारे येस बँक व टाटा मोटर्स मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या प्रमुख निर्देशांकांतून बाहेर पडले आहेत. त्यांच्याऐवजी सहभाग घेणाऱ्या नेस्ले इंडिया, टायटन कंपनी व अल्ट्राटेक सिमेंटचे व्यवहार येत्या सोमवारपासून ३० कंपनी समभागांच्या निर्देशांकात होतील.

बाजार भांडवलाबाबतच्या हालचालींमुळे सेन्सेक्समधील प्रमुख ३० कंपन्यांच्या यादीत फेरबदल झाले आहेत. प्रत्यक्षातील त्यांचे बदल येत्या सोमवारपासूनच्या व्यवहाराद्वारे होतील. मुंबई शेअर बाजाराच्या अन्य काही निर्देशांकांमधील कंपन्यांमध्येही फेरबदल करण्यात आले आहेत.

सेन्सेक्समधील टाटा समूहातील टाटा मोटर्स, आघाडीची खनिकर्म वेदांता लिमिटेड तसेच येस बँक या खासगी बँकेच्या समभागांचे व्यवहार आता मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकातून होणार नाहीत. त्यांच्याऐवजी नेस्ले इंडिया, टाटा समूहातीलच टायटन कंपनी व आदित्य बिर्ला समूहातील अल्ट्राटेक सिमेंट हे सेन्सेक्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

आर्थिक ताळेबंद व प्रवर्तकांचा सहभाग यावरून चर्चेत राहिलेल्या येस बँकेचे समभाग मूल्य गेल्या वर्षभरात ६.८० टक्क्यांनी घसरले आहे. तर वेदांता लिमिटेड या दरम्यान तब्बल २८.८० टक्क्यांनी आपटला आहे.

टाटा समूहातील टाटा मोटर्स गेल्या १२ महिन्यांमध्ये ११ टक्क्यांहून अधिक प्रमाणात आपटला आहे. टाटा मोटर्सच्या दबावामुळे मुंबई शेअर बाजारातील वाहन निर्देशांक हा गेले वर्षभरात दुसरा सुमार क्षेत्रीय निर्देशांक ठरला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी निर्देशांक घसरण नोंदविणाऱ्या भांडवली बाजारात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह सूचिबद्ध बँकांचे समभाग मूल्यही शुक्रवारी खाली आले. वरच्या मूल्यांवरील समभागांच्या खरेदीचे धोरण गुंतवणूकदारांनी सप्ताहअखेरच्या सत्रातही कायम ठेवले.

सप्ताहात मुंबई निर्देशांक अवघ्या २.७२ टक्क्यांनी विस्तारला आहे. तर निफ्टीत या दरम्यान तुलनेत अधिक, १८.९५ टक्के वाढ नोंदली गेली आहे.

बाजाराची पुढील वाटचाल येत्या आठवडाअखेर जाहीर होणाऱ्या चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीवर असेल.