News Flash

एकही पैसा बुडणार नाही – अर्थमंत्री सीतारामन

येस बँकेच्या बिकट आर्थिक स्थितीचे खापर सीतारामन यांनी यूपीए सरकारवर फोडले.

एकही पैसा बुडणार नाही – अर्थमंत्री सीतारामन

येस बँकेच्या डबघाईचे खापर यूपीए सरकारवर

नवी दिल्ली : नव्या पिढीची खासगी बँक असलेल्या येस बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून, तिच्या आर्थिक व्यवहारांवर रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध आणल्यानंतर, शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ठेवीदारांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. येस बँकेतील ठेवीदारांचा एकही पैसा बुडणार नाही, पै न् पै परत दिली जाईल, अशी ग्वाही सीतारामन यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

येस बँकेवर ३० दिवसांसाठी म्हणजे ३ एप्रिलपर्यंत निर्बंध आले असून खातेदारांना जास्तीत जास्त ५० हजार रुपयेच बँकेतून काढता येतील. त्या परिणामी देशभरात सर्वत्र पैसे काढण्यासाठी ‘एटीएम’समोर खातेदारांच्या रांगा लागल्या होत्या. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या येस बँकेच्या ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने येस बँकेला कोणत्याही नव्या कर्जवाटपास तसेच, कर्जाच्या फेररचनेस मनाई केली आहे. मात्र, बँकेच्या २० हजार कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देण्याची मुभा दिली आहे.

हे सारे काँग्रेसमुळे!

येस बँकेच्या बिकट आर्थिक स्थितीचे खापर सीतारामन यांनी यूपीए सरकारवर फोडले. बँकेतील आर्थिक समस्या काँग्रेस सरकारच्या काळात उद्भवल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. येस बँकेच्या संकटाला आम्ही जबाबदार असल्याचे विरोधक सांगत आहेत. विनाकारण त्यांच्यावर आरोप करायचे नाहीत पण, त्यांनी तसे कारण दिलेले आहे. २००४ ते २०१४ या काळात यूपीए सरकारच्या बँकिंग क्षेत्राच्या हाताळणीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, अशी टीका सीतारामन यांनी केली.

मोठय़ा कंपन्यांना कर्जवाटपामुळे

येस बँकेने २००४ मधील स्थापनेपासून आक्रमक कर्जवाटपाचे धोरण राबवले होते. या बँकेने अनिल अंबानी समूह, एस्सेल समूह, व्होडाफोन, सीसीडी, आयएलएफएस अशा मोठय़ा कंपन्यांना कर्ज दिले होते. आता ते थकीत बनले आहे. या कर्जाची वेळेवर वसुली करता न आल्याने येस बँक अडचणीत आली आहे. ही सर्व कर्जे २०१४ मध्ये म्हणजे यूपीए सरकारची केंद्रात सत्ता असताना दिली गेली. २०१७ पासून रिझव्‍‌र्ह बँकेचे येस बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष होते. या काळात प्रशासनाकडून झालेल्या चुका, कमकुवत व्यवस्थापन यांची माहिती रिझव्‍‌र्ह बँकेला तसेच तपास यंत्रणानाही आहे. शिखर बँकेने २०१८ मध्ये येस बँकेचे संचालक मंडळ बदलण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.

हे निष्णात डॉक्टर..

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी, येस बँक ही ‘नो बँक’ बनली आहे. मोदी आणि त्यांच्या कल्पनांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली असल्याची टीका केंद्र सरकारवर केली. त्याचा संदर्भ घेत सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले. ‘स्वयंघोषित निष्णात डॉक्टर आम्हाला शिकवण देऊ लागले आहेत. त्यांनी (यूपीए सरकार) युनायटेड वेस्टर्न बँक आयडीबीआय बँकेत विलीन केली. मग, आयडीबीआय बँक डबघाईला आली. युनायटेड वेस्टर्न बँक आधीच आर्थिक संकटात असताना हा निर्णय घेतला गेला,’ असे त्या म्हणाल्या.

कर्जवाटप ३५ टक्कय़ांनी कसे वाढले?- चिदंबरम

येस बँकेवरील संकटासाठी यूपीए सरकारला जबाबदार धरणारे सीतारामन यांचे आरोप माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सीतारामन यांच्या आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, ‘वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करण्याची विद्यमान सरकारची सवय आहे. गेल्या पाच वर्षांंमध्ये कर्जवाटप ५५,६३३ कोटींवरून २.४१ लाख कोटी रुपयांवर कसे गेले, याचे उत्तर सीतारामन देतील का?’ येस बँकेच्या कर्जवाटपात पाच वर्षांत ३५ टक्कय़ांची वाढ कशी झाली, असा उपरोधिक प्रश्न चिदंबरम यांनी विचारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2020 2:57 am

Web Title: your money is safe fm nirmala sitharaman assures yes bank customers zws 70
Next Stories
1 गुंतवणूकदारांना ३.२८ लाख कोटींचा फटका
2 बाजार-साप्ताहिकी : भय इथले..
3 येस बँकेच्या एकाही खातेधारकाचे पैसे बुडणार नाहीत – निर्मला सीतारमन
Just Now!
X