14 October 2019

News Flash

‘झी’ची झड सुरूच!

वित्तीय निकालाविषयी अफवांविरोधात कंपनीचा खुलासाही निष्प्रभ

वित्तीय निकालाविषयी अफवांविरोधात कंपनीचा खुलासाही निष्प्रभ

मुंबई : झी एंटरटेन्मेंट एंटरप्राइजेसने भांडवली बाजारातील वदंतांना खोडून काढताना, आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी लेखापरीक्षित वित्तीय ताळेबंद सादर करण्यात कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले. येत्या २७ मे रोजी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय विचारात घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

तथापि, कंपनीकडून हा खुलासा येण्यापूर्वीच झी एंटरटेन्मेंटचा समभागाचे मूल्य गेले पाच दिवस सातत्याने गटांगळी घेताना दिसले. बुधवारच्या व्यवहारात, मुंबई शेअर बाजारात ९.७२ टक्के घसरणीसह हा समभाग दिवसअखेर ३३३.३० रुपयांवर स्थिरावला. सलग पाच दिवसांमध्ये समभागाने तब्बल २२.८९ टक्क्यांचा मूल्यऱ्हास सोसला आहे.

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये झी एंटरटेन्मेंटचे प्रवर्तक एस्सेल समूहाने कंपनीतील ५० टक्के भागभांडवली हिश्शासाठी संभाव्य गुंतवणूकदारांचा शोध घेत असल्याचे जाहीर केले. तर मंगळवारी ही हिस्सा विक्रीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे एस्सेल समूहाने स्पष्टीकरण केले. तथापि, बिघडलेली आर्थिक स्थिती पाहता, झीला सरलेल्या आर्थिक वर्षांचा वित्तीय ताळेबंदही यंदा सादर करता येणार नाही, अशी भांडवली बाजारात जोरदार अफवा आहे.

एस्सेल समूहाकडून हिस्सा विक्रीची प्रक्रिया तूर्तास शेवटच्या टप्प्यात इतकेच सांगता येईल, अन्य कोणताही तपशील या संबंधाने देता येणार नाही, असेही शेअर बाजाराला दिलेल्या स्वतंत्र स्पष्टीकरणात झीने म्हटले आहे.

First Published on May 9, 2019 2:03 am

Web Title: zee shares fall over 9 percent