बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रकार दिवसेंदिवस उघडकीला येत असताना, या बनावट नोटांचे प्रमाण धडकी भरण्याइतके प्रचंड असल्याचे उघड झाले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये देशात तब्बल १ अब्ज रुपयांहून अधिक दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा हस्तगत झाल्या आहेत.
देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान व बांगला देशसारख्या शेजारी देशांमधून भारतीय चलनातील बनावट नोटांची ‘घुसखोरी’ करण्याचेही प्रयत्न सतत सुरू असतात. बांगला देशाच्या सीमेनजिक असलेले पश्चिम बंगालमधील माल्दा हे गाव तर केवळ बनावट नोटा तयार करण्यासाठी आणि त्या देशाच्या इतर भागांत पाठवण्यासाठी कुख्यात झाले असून, ही गोष्ट सर्वज्ञात असतानाही येथील राजकीय वरदहस्तामुळे हा गोरखधंदा बिनबोभाट सुरू आहे.
देशात बनावट नोटा खपवताना पकडल्या गेलेल्या दहाजणांपैकी सरासरी ७ ते ८ जण माल्दा येथून आल्याचे कबूल करतात, यावरून या बाबीचे गांभीर्य लक्षात यावे.
१ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१४ या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण २३ लाख ४४ हजार ७६३ बनावट नोटा देशात विविध मार्गानी चलनात आल्यानंतर त्यांचा छडा लावला गेला.
भारतीय चलनात त्यांचे एकूण मूल्य तब्बल १ अब्ज ९ कोटी १२ लाख ७ हजार ३५ रुपये इतके होते! म्हणजेच पकडल्या गेल्या नसत्या, तर एवढय़ा मूल्याच्या समांतर नोटा चलनात बिनबोभाट सामावून गेल्या असत्या.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या काऊंटर्सवर, विविध बँकांनी रिझव्‍‌र्ह बँकेमध्ये जमा करण्यासाठी आणलेली रक्कम मोजताना, तसेच इतर बँकांमध्ये चाचणीदरम्यान या बनावट नोटा लक्षात आल्यानंतर त्या चलनातून बाद करण्यात आल्या.
तथापि, ही केवळ नजरेत आल्याने पकडल्या गेलेल्या नोटांची आकडेवारी असून, पकडल्या न जाता लहान-सहान गावांच्या बाजारपेठांमध्ये आणि मोठय़ा शहरांमध्येही खपवल्या गेलेल्या बनावट नोटांचे प्रमाण किती असेल, याची कुणालाही कल्पना नाही आणि ते शोधण्याची कुठलीच यंत्रणा नाही.
*५०० च्या नोटा सर्वाधिक
गेल्या पाच वर्षांमध्ये देशात पकडल्या गेलेल्या बनावट नोटांमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांची संख्या सर्वाधिक म्हणजे १२,९०,३५५ एवढी आहे. त्याखालोखाल शंभर रुपये दर्शनी मूल्याच्या ६,१७,४९६ तर एक हजार रुपये दर्शनी मूल्याच्या ३,८१,५७४ नोटांचा समावेश आहे. पन्नास रुपयांच्या ५३,६०८, वीस रुपयांच्या ८२५ आणि दहा रुपयांच्या ९०२ नोटा हस्तगत झाल्या आहेत.
*१ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१४ दरम्यान २३ लाख ४४ हजार ७६३ बनावट नोटा देशात विविध मार्गानी चलनात आल्यानंतर त्यांचा छडा लावला गेला.