नवी दिल्ली : वेगवेगळ्या सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ असंघटित कामगारांपर्यंत पोहचावेत आणि श्रमिकांमधील या वंचित घटकाला ओळख व संघटित रूप मिळविता यावे यासाठी कार्यरत ई-श्रम संकेतस्थळावर कामगारांची नोंदणी लवकरच १० कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठेल अशी चिन्हे आहेत.सरलेल्या सप्ताहअखेर ई-श्रम संकेतस्थळावरील नोंदणी ९.७ कोटींवर गेली असून, दररोज सरासरी १० लाख नोंदणीचे प्रमाण पाहता चालू सप्ताहात त्यात आणखी ३० लाखांहून अधिक भर पडून १० कोटींचा टप्पा गाठला जाणे अपेक्षित आहे. मागील सप्ताहात रविवारी १३.९७ लाख तर शनिवारी १४.९५ लाख कामगारांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे.

केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाकडून ‘ई-श्रम पोर्टल’ विकसित करण्यात आले आणि २६ ऑगस्टला अनावरणानंतर, केवळ तीन महिन्यांत १० कोटींचा टप्पा उत्साहदायी असल्याचे सरकारने मत नोंदविले आहे. बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारी कामगारांसह, भूमिहीन शेतमजूर व इतर काही असंघटित कामगारांची नोंदणी या संकेतस्थळावर सुरू आहे. केंद्रीय कामगार व रोजगारमंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नुकतेच ई-श्रम संकेतस्थळाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. केंद्र सरकारने देशभरातील विविध क्षेत्रांतील सुमारे ३८ कोटी असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

नोंदणी केलेल्या ९.७ कोटींपैकी ५२.०८ टक्के महिला, ४७.९२ टक्के पुरुष आहेत. ७२.४६ टक्के हे अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय असे सामाजिकदृष्टय़ा मागास घटकांतील आहेत.