चालू आर्थिक वर्षांतील सर्वात मोठी सरकारची हिस्साविक्रीची प्रक्रिया एनटीपीसीच्या भागविक्रीला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाने अखेर पार पडली. सरकारने या देशातील सर्वात मोठय़ा वीजनिर्मिती कंपनीतील ९.५ टक्के हिस्सा विकून ११,४०० कोटी रुपयांचा निधी उभारला. निर्गुतवणूक प्रकियेतून सरकारने चालू आर्थिक वर्षांत केलेली ही सर्वात मोठी कमाई आहे.
एनटीपीसीच्या विक्रीसाठी खुल्या झालेल्या ७८.३२ कोटी समभागांसाठी गुरुवारी सकाळपासून बोलीला सुरुवात झाली आणि भांडवली बाजार बंद होण्याच्या ठोक्याला भागविक्रीने भरणाही पूर्ण केला. प्रति समभाग रु. १४५ दराने ही भागविक्री झाली. प्रत्यक्षात १३२.८४ कोटी समभागांसाठी म्हणजे १.७ पटीने अधिक प्रतिसाद भागविक्रीने मिळविल्याचे सायंकाळी उशीरा उपलब्ध माहितीवरून स्पष्ट झाले. या माध्यमातून कंपनीतील सरकारचा हिस्सा ८४.५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांवर येणार आहे.
२०१२-१३ साठी सरकारने निर्गुतवणुकीच्या माध्यमातून आतापर्यंत १० हजार कोटी रुपये उभारले आहेत. त्यात एनटीपीसीच्या ताज्या हिस्साविक्रीतून मिळणाऱ्या रु. ११,४०० कोटींची भर पडेल. केंद्रीय अर्थसंकल्पात मात्र निर्गुतवणुकीचे उद्दिष्ट ३० हजार कोटी रुपयांचे निश्चित करण्यात आले आहे.
निर्गुतवणूक आजवर
२०१२-१३ मधील सरकारी हिस्सा-विक्री
* ऑईल इंडिया    ३,१४१ कोटी रु.
* एनएमडीसी    ६,००० कोटी रु.    
* हिंदुस्थान कॉपर       ८०० कोटी रु.
* एनबीसीसी       १२५ कोटी रु.
* एनटीपीसी         ११,४०० कोटी रु.