पीटीआय, नवी दिल्ली : महागाईच्या आगडोंबात सर्वसामान्यांची होरपळ ही महिन्यागणिक वाढतच असल्याची आकडेवारी मंगळवारी पुढे आली. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दरात सरलेल्या एप्रिलमध्ये १५.०८ टक्के वाढ नोंदविली गेली असून, अन्नधान्य, इंधनापासून ते खाद्य वस्तूंपर्यंत सर्वच जिनसांच्या किमतींच्या उडालेल्या भडक्याने महागाई दराने १७ वर्षांपूर्वीच्या उच्चांकी पातळीलाही मागे टाकले आहे. 

मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२१ पासून सलग तेराव्या महिन्यात घाऊक महागाई दर दोन अंकी स्तरावर कायम आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात तो १०.७४ टक्के पातळीवर होता. तर मार्च २०२२ मध्ये नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती आणि त्यापरिणामी देशांतर्गत उत्पादित किमतीत वाढीमुळे महागाई दर १४.५५ टक्के नोंदविला गेला होता.

मुख्यत: खनिज तेल, मूलभूत धातू, अन्नधान्य, इंधन व नैसर्गिक वायू, रसायने आणि रासायनिक उत्पादने, अखाद्य वस्तू आणि अन्नधान्य आदींच्या किमती मागील वर्षांच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढल्या आहेत. ज्याचा निर्मिती उद्योगाच्या खर्च आणि उत्पादनाच्या किमतीत वाढीचा एप्रिलमध्ये घाऊक महागाई निर्देशांकावर वृद्धी दर्शविणारा परिणाम दिसून आला आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले.

रशिया-युक्रेन संघर्षांमुळे जागतिक स्तरावर पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याने मुख्यत: इंधन आणि ऊर्जेच्या साधनांच्या किमती भयंकर तापल्या आहेत. तर उष्णतेच्या तीव्र लाटेचा तडाखा बसल्याने फळे, भाजीपाला आणि दूध यासारख्या नाशवंत वस्तूंच्या किमतीही तीव्र रूपात वाढल्या आहेत. चहाच्या किमतीतही वाढ झाल्यामुळे प्राथमिक अन्नधान्य महागाईचा टक्का वाढला आहे. क्षणिक आणि तात्पुरत्या किंमतीतील अस्थिरतेचा घटक वगळला तरी अंतरक चलनवाढीचा (कोअर इन्फ्लेशन) दर एप्रिलमध्ये ११.१ टक्के असा चार महिन्यांच्या उच्चांकी नोंदविला गेला, ज्यातून अर्थव्यवस्थेतील चलनवाढीचा चढा कल दर्शवितो.

भारतात व्याजदरासाठी महत्त्वाची मोजपट्टी मानला जाणारा किरकोळ महागाई निर्देशांक सरलेल्या एप्रिलमध्ये ७.७९ टक्के नोंदला गेल्याचे मागील आठवडय़ात आलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. या दराचा हा  गेल्या आठ वर्षांतील कळस आहे. सलग चौथ्या महिन्यात तो रिझव्‍‌र्ह बँकेला अपेक्षित लक्ष्यापेक्षा अधिक राहिला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने महागाई आटोक्यात आणण्यासाठी ४ मे रोजी रेपोदरात ४० आधार बिंदूंची वाढ केली होती.

किंमतवाढीचा आगडोंब

एप्रिल महिन्यात भाजीपाला, गहू, फळे आणि बटाटय़ाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने अन्नधान्याचा महागाई दर ८.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे.  इंधनाच्या किमती एप्रिलमध्ये ३८.६६ टक्के म्हणजे जवळपास दुपटीने कडाडल्या. त्यातही खनिज तेल आणि नैसर्गिक वायूतील भडका तर सरलेल्या एप्रिलमध्ये ६९.०७ टक्क्यांवर पोहोचला आहे. निर्मित वस्तू आणि तेलबियांमधील किंमतवाढीचा टक्काही अनुक्रमे १०.८५ टक्के आणि १६.१० टक्क्यांवर गेला आहे.