नवीन गुंतवणुकीसह, साडेसात लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

वाहन आणि वाहनांशी निगडित उद्योग क्षेत्रातील उत्पादन वाढीला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने २६,०५८ कोटी रुपयांच्या उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला बुधवारी मंजुरी दिली. करोनाकाळात फटका बसलेल्या वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी हा निधी वापरात येणार असून, सुमारे साडेसात लाख रोजगार संधी यातून निर्माण होणे अपेक्षित आहे.

वाहन, वाहनांशी निगडित सुटेभाग आणि ड्रोन उद्योगासाठी हा निधी दिला जाणार असून यामुळे भारताची या क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल. पीएलआय योजना पाच वर्षांत ४२,५०० कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक आणेल आणि उत्पादन क्षमतेत २.३ लाख कोटींपेक्षा अधिक भर टाकली जाईल, असा विश्वास माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाची माहिती देताना व्यक्त केला.

पीएलआय योजनेमुळे वाहन उद्योगात ७.६० लाखांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार असून प्रोत्साहन निधी येत्या पाच वर्षांत टप्याटप्याने दिला जाईल, असे ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

महिंद्र अँड महिंद्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शहा यांच्या मते, भारतात विद्युत वाहनांच्या स्वीकृतीच्या दिशेने ही योजना म्हणजे एक मोठे पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.  विद्युत वाहनांसाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ बनून उदयास येईल, असेही ते म्हणाले.