नऊ हजार जणांना नोकरीची संधी

मुंबई : ‘दुबई वर्ल्ड एक्स्पो’मधील गुंतवणूक करारांनंतर मंगळवारी विविध १२ कंपन्यांनी महाराष्ट्रात ५,०५१ हजार कोटींची गुंतवणूक करण्यासाठी सामंजस्य करार केले. या गुंतवणुकीतून ९ हजार जणांना नोकरीची नवी संधी मिळणार आहे.

संरक्षण, अंतराळ संशोधन, माहिती तंत्रज्ञान, जैव-इंधन, इलेक्ट्रिक वाहननिर्मिती, निर्यातप्रधान उद्योग, अन्न प्रक्रिया, स्टील, इथेनॉल, औषध निर्माण आदी क्षेत्रांत कार्यरत कंपन्यांनी राज्यात गुंतवणुकीसाठी रस दाखविला आहे. या १२ सामंजस्य करारांतून राज्यात ९,००० पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होतील, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. या गुंतवणूकदारांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, सोलर एव्हिएशन, पद्मावती पेपर्स, देश अ‍ॅग्रो, डी डेकॉर या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

 हे गुंतवणूक करार पूर्णत्वास येण्यासाठी उद्योग विभागाने कंबर कसली आहे. या गुंतवणुकीद्वारे राज्याचा सर्वांगीण औद्योगिक विकास साधता येणार आहे, असे देसाई यांनी सांगितले. या प्रसंगी उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘रोलऑन’ची ३५० कोटींची गुंतवणूक; सरकारच्या कार्यतत्परतेचे कंपनीकडून कौतुक

मुंबई : तमिळनाडू राज्यातील कोइम्बतूर येथे मुख्यालय असलेल्या वाहन आणि वाहनपूरक घटक क्षेत्रातील एलजीबी समूहाच्या रोलऑनची राज्यात गुंतवणूक होत असून त्यांनी त्यासाठी नागपूरची निवड केली आहे. येथील अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रामध्ये ६०,००० चौ.मी. भूखंड वाटपास मंजुरी देण्यात आली आहे. कंपनीस प्राधान्य तत्त्वाने एकाच दिवसात देकारपत्र देऊन राज्य औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीने नवीन विक्रम नोंदविला.

एलजीबी या समूहाचा राज्यातील तिसरा तर देशातील हा २८ वा प्रकल्प विस्तार आहे. महामंडळाच्या कार्यतत्परतेमुळे भूखंडाचे वाटप करण्यास देकारपत्र देणे शक्य झाले आहे. नागपूरमधील प्रकल्पातून समूहाची ३५० कोटींची गुंतवणूक होत असून, त्यायोगे ५०० प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत. 

एलजीबी समूहाने एमआयडीसीच्या संकेतस्थळावर १ डिसेंबरला भूखंड मागणीसाठी विनंती केली होती. त्या संबंधाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत आपल्या कंपनीचा प्रकल्प अहवाल सादर केला होता. त्यावर शनिवारी ४ डिसेंबरला भूखंड वाटप समितीमार्फत घेतलेल्या निर्णयामुळे रोलऑन कंपनीस भूखंड वाटपाकरिता एकाच दिवसात देकारपत्रही देण्यात आले आहे. यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महामंडळाचे आभार व्यक्त करत कौतुक केले आहे.