पीटीआय, नवी दिल्ली : केंद्राकडे ५ जी ध्वनिलहरींच्या विक्रीपोटी १७,८७६ कोटी रुपयांचा महसूल आला असून, भरणा करणाऱ्या दूरसंचार कंपन्यांना गुरुवारी ध्वनिलहरींच्या वाटपाचे पत्रही वितरित केले गेले आणि त्यांना लवकरात लवकर ५ जी सेवा सज्ज करण्यास सांगण्यात आले, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले.

चालू महिन्यात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडा-आयडिया आणि अदानी डेटा नेटवर्क्‍स यांनी ५ जी ध्वनिलहरींसाठी लावलेल्या बोलीनुसार केंद्र सरकराने ५ जी ध्वनिलहरींचे वाटप केले असून त्यानुसार ध्वनिलहरी वाटपाचे पत्र कंपन्यांना दिले आहे. गेल्या महिन्यात २६ जुलैपासून सात दिवस चाललेल्या ५जी ध्वनिलहरींच्या लिलावात एकंदर १,५०,१७३ कोटी रुपयांच्या बोली लावल्या गेल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या ५ जी लिलावापोटी भारती एअरटेलने सर्वाधिक ८,३१२.४ कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे. त्यापाठोपाठ जिओने ७,८६४.७८ कोटी रुपये, व्होडा-आयडियाने १,६७९.९८ कोटी रुपये आणि अदानी डेटा नेटवर्क्‍सने १८.९४ कोटी रुपये दूरसंचार विभागाला दिले आहेत. ५जी ध्वनिलहरींच्या लिलावात सर्वाधिक बोली रिलायन्स जिओने लावली आहे.